पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा शोषक-शोषित हा संबंध शहरे-खेडी असा साधा भौगोलिक किंवा प्रादेशिक स्वरूपाचा नाही. शोषक दोन्हीकडे आहेत आणि शोषितही. ग्रामीण भागात व्यवहार करणाऱ्या शोषकांची उदाहरणे खरे म्हणजे माजगावकरांच्या पुस्तकातच अनेक आहेत.

 ग्रामीणच नव्हे तर आपल्या एकूण दुःस्थितीचा संबंध माजगावकर भारतीयांच्या ऐका मूलभूत स्वभावदोषाशी जोडतात. तो दोष म्हणजे परावलंबन. हा परावलंबित्वाचा मुद्दा माजगावकरांच्या लेखातून अनेकदा आणि अनेक संदर्भात येतो. 'कासा' ही मिशनरी संस्था वाटीत असलेल्या गव्हावर दुष्काळी भागातली माणसे भाळतात व स्वावलंबनाला सोडचिठ्ठी देतात. अन्नासाठी आपण परदेशांवर अवलंबून राहतो म्हणून आपले अन्नोत्पादन सुधारत नाही. आपली आर्थिक व राजकीय धोरणे परावलंबी असल्यामुळे आपल्याला जगात मान नाही. आपल्या विचारवंतांचे विचार परपुष्ट आहेत, त्यामुळे नवा भारतीय विचार जन्माला येत नाही. अशा रीतीने परावलंबीपणा सर्वदूर भरलेला आहे आणि हाडीमासी खिळलेला आहे.

 मानसिक परवलंबन हा भारतीय व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा, कदाचित मूलभूत महत्त्वाचा घटक आहे हे मलाही मान्य आहे. अडचणींवर पुरुषार्थाने, जिद्दीने मात करणे हा आपला स्वभाव नाही. तिचा बाऊ करणे, आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणे व मग आत्मानुकंपेत मग्न होणे अशी आपली स्वभाववैशिष्ट्ये आहेत.

 पण आपल्या राष्ट्रीय स्वभावाबद्दलच्या ह्या जाणिवेचा प्रत्यक्ष सामाजिक नियोजनात कसा उपयोग करावा याचा विचार फार काळजीपूर्वक करावा लागेल. मुळात माजगावकरांनी स्वावलंबन याचा नेमका अर्थ काय करायचा हे तपासून पाहिले पाहिजे. कारण त्यांच्या लेखनातून त्यांचा अभिप्राय पुरेसा स्पष्ट होत नाही. परदेशी धान्य फुकट मिळाले तर परावलंबन ; पण ते विकत घेतले तरी परावलंबनच का? असा प्रश्न विचारावासा वाटतो. याचे कारण खते परदेशांतून घ्यायला, एवढेच नव्हे तर खतकारखाने परकीय मदतीने काढायलासुद्धाऱ्यााला ते खतकारखान्यांची 'आयात' म्हणतात - त्यांचा विरोध आहे असे दिसते. ( पृ ९२-९३ ) खरे म्हणजे अन्नाऐवजी खते आयात करणे हे टप्पे म्हणजे माजगावकरांना प्रिय असलेल्या अन्नस्वावलंबनाच्या मार्गावरचेच टप्पे आहेत. यात परकीयांची मदत लागेल आणि अशी मदत स्वीकारायची म्हटले तर माजगावकर म्हणतात ते सगळे धोके त्यात आहेतही ; पण हे धोके काही प्रमाणात पत्करुन ( कारण आंतरराष्ट्रीय वास्तवाचा तो एक भाग आहे ) पण राष्ट्रीय स्वातंत्र्याचा बळी न देता शहाणपणाने अशा मदतीचा उपयोग करणे ही गोष्ट सर्वस्वी अशक्य कोटीतलीच आहे अशी दढ समजत मनाशी करून ठेवण्याचे काही कारण दिसत नाही. पुढे जाऊन असेही विचारता येईल, ‘अन्न

। १७८ ।