पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/184

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उन्हात वीस मैल सायकलपीट करीत बैठकीची वेळ गाठणारे आणि अनेक सामाजिक व्यवधानात स्वतःला हरवून घेतलेले विठ्ठलराव भोईटे आहेत. आपला एकट्याचा फोटो छापला तर गावाला काय वाटेल अशी संवेदना जिवंत असलेले आणि नागझरी गावात अनंत कामे उठवणारे कर्तबगार शेतकरी एकनाथ भोसले आहेत. सुप्याचे रतनलाल भंडारी आहेत. कोंढाण-दामखिंडचे आबा करमरकर आहेत. ‘याच परिसरात तो तपस्वी भागवत आपले प्रयोग करीत करीत झिजून मेला,' या वाक्याने सुरू होणारे सिंहगड भागात तळी बांधून पाणी साठविण्याचा ध्यास घेणाऱ्या कैलासवासी शंकरराव भागवत या फटकळ, एकांड्या, हेकट पण ध्येयासक्त आणि उपेक्षित पुरुषाचे शब्दचित्र आहे. शिवाय उत्तर प्रदेशातील एका कुग्रामात राहून दिसेल त्या अन्यायाला, ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला आपल्या लेखणीचे बलरामाचे मुसळ करून ठेचणाऱ्या आणि या युद्धात आत्माहुती देणाऱ्या एका संन्यासी संपादकाविषयी शेवटी एक तेजस्वी प्रकरण आहे.

 माजगावकरांनी ग्रामीण प्रश्नांविषयी व त्यांच्या निमित्ताने जे विचार मांडले आहेत त्यांचा थोडा परामर्श आता घेतला पाहिजे.

 'ग्रामीण भागाचे अखंड अहर्निश शोषण' चाललेले आहे असे माजगावकर म्हणतात आणि खेडी व शहरे यांचे संबंध शोषित आणि शोषक अशा प्रकारचे आहेत असे ध्वनित करतात. हे मला खरे वाटत नाही. अशा ग्रामीण शोषणातून नागरी औद्योगीकरण घडवून आणण्याचे जगाच्या आर्थिक इतिहासात नोंदले गेलेले महत्त्वाचे मार्ग म्हणजे ग्रामीण भागावर डोईजड कर लादणे किंवा शेतीच्या विक्रय मालाची पातळी कृत्रिमरीत्या खाली ठेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणे हे होत. ह्यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्या देशात झालेली नाही. शेतीवरील कराचा, त्यातल्या त्यात श्रीमंत शेतकऱ्यांना भराव्या लागणऱ्या करांचा, भार फार हलका आहे-इतका की शेतीविभाग राष्ट्रीय नियोजनाला फारसा हातभार लावीत नाही अशी तक्रार आहे आणि शेतीमालाच्या गेल्या कित्येक वर्षातील किमतींवर आणि त्यांच्या वाढीच्या वेगावर नजर टाकली तर उलटच अनुभव येईल. म्हणून ग्रामीण भागाची पिळवणूक करून शहरांची व त्यातल्या उद्योगधंद्याची भर करणे असे आपल्या नियोजनाचे स्वरूप आहे असे सुचविणे योग्य ठरणार नाही. अर्थात हे खरे आहे की, ग्रामीण भागाचा विकास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही, शेतीचे उत्पादन पुरेशा वेगाने वाढले नाही, दारिद्रय वाढले आहे आणि विषमता वाढली आहे; पण याची कारणे इतरत्र शोधायला हवीत-कदाचित काही चुकीच्या धोरणांमध्ये, काही चांगल्या धोरणांच्या वाईट अंमलबजावणीत. शिवाय ग्रामीण दारिद्रयाचा विचार करावाच पण शहरांतील दारिद्रयही विसरू नये.

ग्रा...१२

। १७७ ।