पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

-स्वतंत्रता ' तरी कशासाठी ? देशांतल्या देशातच आपले सगळे अन्न पिकवण्यापेक्षा काही थोड्या इतर वस्तु उत्पादित करून त्यांच्या बदल्यात परदेशांतून धान्य विकत घेतले आणि हा व्यवहार एकूण फायद्याचा झाला तर त्याला काय म्हणून आक्षेप घ्यावा ? अर्थात एखाद्या वेळी एखाद्या राष्ट्राला अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असण्याचीही निकड वाटणे शक्य आहे; पण कोणत्याही धोरणाची निवड केली तरी त्याच्या कसोट्या आर्थिक किंवा व्यापक अर्थाने व्यावहारिक असावयास हव्यात. अन्नस्वतंत्रता हा मानबिंदू ठरविता कामा नये. आपल्या देशात ' मानबिंदू ' वाजवीपेक्षा जरा जास्तच आहेत. त्यात आणखी एकाची भर कशाला ?

 दुसरे असे की, परावलंबन लुळे करणारे असते हे खरे असेल तरी परावलंबन नाहीसे केल्यावर लगेच अंगात शक्ती येते असे निश्चयाने सांगता येत नाही. कदाचित अधिक लुळेपणा व त्याचबरोबर अधिक दुर्दशा ह्याही गोष्टी शक्य आहेत. उदाहरणार्थ, दुष्काळात माणसे मृत्युमुखी पडत आहेत आणि एखादा देश अन्नाची मदत करावयास तयार आहे, तर मदत घ्यावी की नाही ? माजगावकर म्हणतील घेऊ नये. मला इतकी खात्री नाही. कारण मदत नाकारली तर आपण एकदम जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पुरुषार्थी होऊ आणि पुरेसे अन्नधान्य लगेच निर्माण करू असे सांगवत नाही. उलट, अशा निर्णयामुळे जास्तच माणसे भुकेने तडफडून मरतील अशीही भीती आहे.

 मला असे वाटते की, परावलंबी मनोवृत्ती हा आपल्या देशाचा सर्वसाधारण स्वभाव ध्यानात घेतला तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याच्या आधारावर घ्यावयाचे निर्णय फार जपून घेतले पाहिजेत. एका उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करता येईल. चीनविरुद्ध लढाई सुरू झाली तेव्हा आपण अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची मदत घेतली. ही गोष्ट चांगलीच झाली असे कोणीही म्हणेल. त्या परिस्थितीत स्वाभिमानाच्या गप्पा कोणी मारल्या असत्या व मदत घेऊ नये असे सांगितले असते तर स्वतः माजगावकरांनीच त्याची काय संभावना केली असती याबद्दल मला शंका वाटत नाही. अशा रीतीने माजगावकरांचा मूलभूत समाजशास्त्रीय विचार ढोबळ मानाने बरोबर असला तरी त्यातून ते जे व्यावहारिक निष्कर्ष काढतात ते अतिरेकी स्वरूपाचे वाटतात.

 यामागे भारताच्या खऱ्या समस्यांविषयीची काहीशी अपुरी समजूत हेही एक कारण असावे. माजगावकर एका ठिकाणी म्हणतात, "वास्तविक तज्ज्ञांनी आता हे स्पष्ट केलेले आहे की, आपली अन्नतूट, आपले दुष्काळ यांचा संबंध कमी उत्पादनाशी असलाच तर तो थोडा आहे. मुख्य दोष आहे तो वाटपव्यवस्थेचा." खरोखर उत्पादन जर पुरेसे असेल तर माजगावकर जिला ‘वाटपव्यवस्था' म्हणतात तिची जरूरच उरणार नाही ! मागणीच्या मानाने आपले उत्पादन वाढलेले नाही.

। १७९ ।