पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चौकशी नीट झाली तरच सत्य काय आहे ते बाहेर येणार. तोवर सगळाच तर्कवितर्क, सगळाच कल्पनाविलास.

पण चौकशी तरी नीट होईल का ? तेथील थंडपणा, बेफिकिरी, विरोधी शक्तींची दडपणे, परस्पर संगनमते पहाता याची तरी शाश्वती कशी देणार ?

दिल्लीच्या स्टेट बँकेतील साठ लाखाच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास, गुन्हेगाराला शिक्षा आणि चौकशी अधिकाऱ्यांना बढती, हे सर्व या देशात अठ्ठेचाळीस तासाच्या आत घडू शकते.

पण विद्युत्गतीचे हे न्यायदान दिल्लीच्या शहेनशहांसाठी, नबाबांसाठी !

स्वामी सच्चिदानंद आणि गोविंद रेड्डी हे कोण यःकश्चित कार्यकर्ते ?

असतील लोकसेवक, क्रांतिकारक, समतेच्या यज्ञकुंडात आपल्या अस्थिअस्थि, तंतूतंतू समर्पित करणारे कुणी दधिची !

पण त्यांची आज गरजच काय ?


*


५ जून १९७१