पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खारी गावाच्या लोकांनी सांगितलेली कथा अशी : बंदुकीचे आवाज आले म्हणून आम्ही दहा-पाच जण धावलो. प्रथम वाटले की, आसपास दरोडा पडला असावा; कारण गोपालपूरला २-४ दिवसांपूर्वी एक दरोडा पडलेला होता; पण आवाज आश्रमाच्या बाजूने आला. म्हणून काहीजण तिकडे धावले. भीतीमुळे फार पुढे कुणीच गेले नाही. तासादोनतासांनंतर भीड थोडी चेपली, एक-दोन पुढे गेले. आश्रमात जाऊन पहातात तो स्वामिजींचा खून झालेला होता. गोविंद रेड्डी अर्धवट मृतावस्थेत आढळले. त्यानंतर थोड्या वेळाने रेड्डींचा प्राण गेला.

निकटवर्तीय जाणकारांनी नंतर एकेक दुवा जुळवत जुळवत तयार केलेले चित्र असे : हल्लेखोरे भाडोत्री होते. स्वामिजींना त्यांनी पाहिलेलेही नव्हते. चुकून त्यांनी प्रथम रेड्डीवरच हल्ला केला. नंतर स्वामिजी जेव्हा रेड्डी, रेड्डी म्हणून ओरडले तेव्हा त्यांनी आपला मोर्चा स्वामिजींकडे वळवला. रेड्डींना तसेच अर्धवट जखमी स्थितीत त्यांनी सोडून दिले. कारण त्यांना फक्त स्वामिजींचा बळी घ्यायचा होता.

यातले काय खरे, काय खोटे, सत्य कोणते, कल्पित किती हे ठरविणे कठीण आहे. भलतेच दोन-चार लोक गुन्हेगार म्हणून अडकवून मूळ कट दडपण्याचा पोलिसांचा कावा आहे असा संशय बिजनौरमध्ये उघडपणे व्यक्त केला जात आहे, हे मात्र खरे. पोलिसांनी हे प्रकरण घिसाडघाईने मिटवून सत्य दडव नये यासाठी स्वामिजींचे चहाते येथे प्रयत्नशील आहेत. राज्यपांलापर्यंत मंडळी पोचली आहेत, पोलिसांकडून चौकशीचे काम काढन घेऊन गप्तचर विभागाकडे हे प्रकरण सोपविले गेले आहे. कट असावा, मारेकरी भाडोत्री असावेत ही शक्यता अधिक दिसते. पण कटाच सूत्रधार तरी कोण असावेत ?

एक प्रवाद असा : एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना स्वामिजींनी नुकताच पुराव्यानिशी अडकवला होता. लवकरच हे प्रकरण कोर्टासमोर उपस्थित होणार होते. त्याआधी स्वामिजींचा काटा दूर करणे त्याला अवश्य वाटले असावे.

आणखी एक स्थानिक तर्क : स्वामिजींनी खारीतील धर्माध मुसलमानांविरुद्ध पुन्हा नवी उचल घेतलेली होती. चिडलेल्या या गोटाचे हे कृत्य.

स्वामिजी शेतमजुरांच्या हक्कांसाठी, त्यांना किमान वेतन दिले जावे, कामावर असताना इजा-दुखापत-अपघात झाल्यास त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी झगडत होते. हिंदू-मुस्लिम या दोन्ही वर्तुळातील जमीनदार-श्रीमंत शेतकरी गटाचा याला तीव्र विरोध होता. या गटाने स्वामिजींना दूर केले-असाही एक उलगडा !

पोलीस खातेही स्वामिजींना पाण्यात पहात होतेच. या खात्याचेच हे कृत्य कशावरून नसावे ? - हाही एक व्यक्त केला जात असलेला संशय.

। १७३ ।