पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चर्चा

एक


स. ह. देशपांडे
अर्थशास्त्र प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ
ग्रामीण व शेतीविषयक प्रश्नांचे विशेष अभ्यासक


' माणूस ' साप्ताहिकाचे संपादक श्री. श्री. ग माजगावकर ह्यांनी गेल्या दहाबारा वर्षात ग्रामीण भागात जे भ्रमण केले, त्या अनुरोधाने जे प्रश्न त्यांच्या मनाला भिडले, जी उत्तरे त्यांनी शोधून काढली आणि ज्या क्रिया त्यांनी प्रवर्तत केल्या त्यांचे चित्रण “ माणूस ' मध्येच पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या या संग्रहात आहे( या संग्रहातले दोनच लेख असे आहेत की, ज्यांचा संबंध ग्रामीण प्रश्नांशी दूरान्वयानेच पोचेल. ) माजगावकर नुसतेच साप्ताहिक चालवीत नाहीत, इतर अनेक चळवळींना चालना देतात. नुसती चालना देत नाहीत, जिथे प्रश्न उपस्थित झाला असेल तिथे धावत जातात, मग ते महाराष्ट्रातच खानदेशातल्या अक्राणी महालाकडे असो किंवा उत्तर प्रदेशातील बिजनौरला असो. प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात, स्वतःचे व माणूसचे जे काय बळ असेल ते हिरीरीने त्या कामी लावतात. भोवळ येईपर्यंत उन्हात हिंडतात, अन्नपाण्यावाचून चालत राहतात. शेतकन्याचे, आदिवासींचे प्रश्न समजावून घेतात, आपल्या विचारातून जे निष्कर्ष निघालेले आहेत ते त्यांना सांगतात, उत्साह देतात. हे सगळे पाहिले की, पहिली गोष्ट मनावर बिंबते ती ही की, हा संपादक जरा वेगळ्याच धर्तीचा आहे. तो कार्यालयीन संपादक नाही, समाजकार्यप्रवण संपादक आहे. आपले काम नुसते सामाजिक संदर्भात पाहायाचे एवढेच नव्हे, तर तो संदर्भच पुनर्रचित करायला हवा या ध्येयदृष्टीने लेखणी, वाणी, बुद्धी व श्रम सतत कारणी लावायचे, असा वसा घेतलेला संपादक असे माजगावकरांचे स्वतःचे जे चित्र या संग्रहातून उमटते त्याचा माझ्या मनावर सुरुवातीलाच उल्लेख करावा इतका मोठा परिणाम झाला आहे.

 ह्या पुस्तकात काय काय आहे ? एका जिल्ह्यातील साक्षरतेच्या चळवळीच्या स्वयंस्फूर्त प्रेरणेचे उत्साहदायक वर्णन आहे आणि लगेच तिचे सरकारीकरण

। १७५ ।