पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या मान्यतेमुळे स्वामिजी सुखावले असतील तर त्यात नवल नाही. कुणाही संपादकाला अभिमान वाटावा असेच हे प्रशस्तीपत्रक होते.

पाक्षिकाचे वय किती ? ६८ च्या सप्टेंबरात ते सुरू झाले आणि आता स्वामिजींबरोबरच त्याचाही अवतार संपलाच म्हणायचा. जेमतेम दोन-अडीच वर्षे. पण जन्मतःच मारुतीने सूर्यबिंब गिळायला झेप घ्यावी तसे हे पाक्षिक पहिल्या अंकापासूनच प्रचंड विरोधी शक्तींशी झुंज घेण्यास सरसावून उठले. बेफिकीर नोकरशाहीला सतत धारेवर धरले गेले. लाचलुचपतीविरुद्ध सतत आवाज उठवला गेला. पोलिसी दडपशाहीचा तीव्र धिक्कार, पुढाऱ्यांच्या भोंदूगिरीचा समाचार, चुकीच्या धोरणांचा कडकडून निषेध-जिल्हा परिषदेने जवळच्या एका रस्त्यावरची झाडे तोडण्याचा सपाटा चालवला होता. हा जो खवळलाय म्हणता ! जिल्हा परिषद अध्यक्षाला पार गुन्हेगार ठरवून मोकळा-The chairman of the Dist. Board Shri Magan Singh of Bharera will go down as the biggest criminal in the arboreal world for signing away the felling of thousands of trees of mammoth girth and imposing heights. डेरेदार आणि प्रचंड उंचीच्या हजारो झाडांची कत्तल करण्याच्या हुकुमावर सही करणारे भरेराचे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मगनसिंग हे वृक्षजगतातील एक भयंकर गुन्हेगार म्हणून ओळखले जातील.

बिजनौर हा ऊस उत्पादकांचा जिल्हा. छोट्या ऊस उत्पादकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या बिजनौर साखर कारखान्याच्या मालकावर हा केवढ्या आवेशाने तुटून पडला. शेठ बनारसी दास. संपादकाच्या भाषेत-बनारसी ठग. दर अंकात या कारखान्याच्या भानगडी संपादक उपसून बाहेर काढीत होता. अगदी खोटी वजन दाखविणाऱ्या कारखान्याच्या वजन काट्यापासून ते गिरणी मालकाने न्यायमूर्तीच्या ड्रायव्हरला दिलेल्या चिरीमिरीपर्यंत. कारण पैशाच्या जोरावर कोर्टाचे खेळ खेळूनच मालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत राहिला होता. हायकोर्टसुप्रीम कोर्टापर्यंत याचे लागेबांधे. याला तुरुंगात डांबण्यासाठी संपादक जिवाचे रान करीत होता. यश येत नव्हते. कायद्यातील नव्या नव्या फटीतून हा बनारसी ठग सारखा निसटत होता. शेवटी परवा एकदा यश आले. पण संपादक मात्र हे यश पहायला या जगात उरला नव्हता. मी बिजनौरला पोचलो त्याच दिवशी या शेठला अटक झालेली होती. रस्त्यात एक नवशिक्षित किसान मला दुसऱ्या दिवशी सहज भेटला, म्हणाला, स्वामिजी आज हवे होते. त्यांना केवढा आनंद झाला असता?

तसाच तो बिजनौर-झालू- हल्दौर या लहानशा रस्त्याचा प्रश्न ! थेट गव्हर्नर गोपाल रेडी यांच्यापर्यंत नेऊन भिडवला याने. गव्हर्नरांना लिहितो : विनोबांबरोबर पदयात्रेत असताना तुंगभद्रेच्या काठावर आपली बारा वर्षांपूर्वी एकदा गाठ पडलेली

। १६८ ।