पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्रांतीची भूमिका त्यांना न मानवणारी-पेलणारी ठरली. पुन्हा देशभरच्या सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्ये नवी पोकळी निर्माण झाली. जयप्रकाश या पोकळीतून वाट दाखवू शकतील अशी आशा वाटत होती, तीही फोल ठरली. तेच स्वतः एका पोकळीत चाचपडणारे. इतरांना काय वाट दाखविणार ?

गेल्या दोन ऑक्टोबरला असे बरेचसे अस्वस्थ, नवी वाट हुडकू पहाणारे कार्यकर्ते सेवाग्रामला जमले होते. स्वामिजीही गेले होते. खूप मनमोकळी चर्चा झाली. स्वामिजींनी आपल्या नेहमीच्या फटकळ पद्धतीने आपले मत धाडकन् सांगून टाकलो

मित्रहो, आपली बस चुकलेली आहे. नक्षलवाद्यांनी आपल्याला हवा होता तो क्षण अचूक पकडलेला आहे. यश त्यांचेकडे गेलेले आहे. त्यांची आणि आपली ध्येयसृष्टीयात बरेच साम्य आहे. त्यांचा हिंसेवर विश्वास, आपण अहिंसेचे पूजक. अहिंसात्मक क्रांतीचा पर्याय आपण जनतेसमोर ठेवू शकलो नाही. यामुळे जनता, विशेषत. तरुणवर्ग नक्षलवादाकडे आकर्षित झाला-अधिकाधिक होतही आहे. आपले विनोबफक्त पन्नास टक्के गांधी आहेत आणि जयप्रकाशांना काही कणाच उरलेला नाहीः आपल्यातील तरुणांनी समग्र क्रांतीसाठी अहिंसक उठावाचा एखादा नवीन कार्यक्रम पुढे आणला तर आपला विनाश टळू शकणार आहे... नाहीतर तो अटळ आहे.

देवेंद्रकुमार गुप्ता हे गांधी स्मारक निधीचे चिटणीस या चर्चेत सहभागी झालेले होते. त्यांनी स्वामिजींच्या परखड विचारांचे खूप स्वागत केले. विशेषतः स्वामिजींच्या पक्षिकाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले : आपल्या विचाराची एकूण २३ नियतकालिके देशातील निरनिराळ्या भाषेत प्रसिद्ध होत असतात. पण स्वामिजींचे ‘पर्सनॅलिटी' हे एकच नियतकालिक काही वेगळे कार्य करीत आहे. बाकीची सर्व तोच तो जुना, आध्यात्मिक मजकूर छापीत असतात. १९६० सालचे या सर्व नियतकालिकांचे अंक १९७० साली वाचले तरी काही फरक पडत नाही.

'Personality-this is perhaps the only journal coming from Sarvodaya writer which reacts sharply to the situation at almost all levels. I mainly agree with the trend it represents although I differ strongly at times with most of its wordings. But that is a minor thing which could be discussed later.'

‘भोवतालच्या परिस्थितीची सर्व पातळ्यांवरून दखल घेणारे, त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया तीव्रतेने व्यक्त करणारे ‘पर्सनॅलिटी' हे एकमेव सर्वोदयी पाक्षिक आहे. अंकातील शब्दयोजना मला अनेक ठिकाणी खटकत असली तरी हा विचारप्रवाह मला बहुतांशी मान्य आहे. शब्दयोजना हा गौण भाग आहे. त्याबाबत आपण सावकाश बोलू शकतो.'

। १६७ ।