पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला दाखविला, म्हणून मी संतुष्ट होतो. पावसाचे आभार मानीत होतो.

 वळिवाच्या सरीने शेती पिकली नाही, तरी सृष्टीचा रखरखीतपणा
 कमी होतो. गावशिक्षणाच्या वळिवाने एवढे कार्य साताऱ्यातील
 माण, फलटण इत्यादी भागातील अगदी उजाड माळरानावरदेखील
 करून दाखविले आहे, यातच मला आनंद वाटत होता.

महत्त्वाचा घटक कमकुवत

या मोहिमेत काम करणारे घटक तीन. प्राथमिक शिक्षक, महसूलखात्याचा सेवकवर्ग आणि गावसमिती. यापैकी प्राथमिक शिक्षकाचे आजचे गावातील स्थान, त्याची नोकरपेशा वृत्ती आणि आर्थिक पातळी या सर्वांचा विचार करता त्याच्याकडून फारच मोठ्या कार्याची अपेक्षा या मोहिमेत बाळगली गेली ही वस्तुस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे. वास्तविक हे कार्य स्वतंत्र व समृद्ध व्यक्तित्त्व असणाऱ्या एखाद्या समाजसेवकाचे. केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने गावची लोकशक्ती जागी करून तिला विवेकाचे व सुसंस्कारांचे इष्ट ते वळण लावायचे, म्हणजे त्यासाठी 'उत्तम गुणी शृंगारला। ज्ञानवैराग्ये शोभला ।' या कोटीतील एखादा ‘श्रीमंत योगीच ' हवा. त्यामानाने आमचा गावातील प्राथमिक शिक्षक आज कोठे आहे ? आवड म्हणून समाजशिक्षणाचे हे कार्य करणारे दहा शिक्षक काही मला या दौऱ्यात पहायला मिळाले नाहीत. पूर्वी चार रुपये दर नवसाक्षर प्रौढामागे मिळत होते, तेही आता मिळत नाहीत, हीच बहुतेकांची तक्रार! पोटासाठी नोकरी पत्करलेला, अधिकारी दडपू म्हणेल तर दडपला जाणारा, पुढाऱ्यांच्या किंवा गावदादांच्या तंत्राप्रमाणे मागेपुढे करणारा, गावातील दुहींच्या रस्सीखेचीत सर्व बाजूंनी खेचला जाणारा, कुणाशीच वैर नको म्हणून डळमळीत व त्रयस्थ वृत्तीनेच गावाशी संबंध ठेवणारा आमचा हा प्राथमिक शिक्षक ! त्याची इच्छा असली, तरी त्याचा परावलंबी नोकरपेशा आणि गावातील त्याचे स्थान त्याला फारसे प्रभावी कार्य करू देणार नाही हे उघड आहे. भरीस भर म्हणून या मोहिमेच्या कालावधीत जनगणनेचे कामही त्याच्याच अंगावर पडले. समाजशिक्षण, जनगणना किंवा इतर नैमित्तिक स्वरूपाची कामे अंगावर पडली तर, शाळा शिकविण्याची किंवा चालविण्याची नित्याची जबाबदारी शिक्षक व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मोहिम आखताना, तिचे उद्दिष्ट व कालावधी निश्चित करताना, मुख्य घटकाची ही कमकुवत तब्येत आम्ही ध्यानात घेतली होती काय ?

। १० ।