पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळी, दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात, प्रौढांना अक्षराची ओळख घडवतो याला काही विशेष मोल आहे. पाटया नाहीत, पेन्सिली नाहीत; फळे नाहीत; अशा वेळी गावकऱ्यांनी गुळाच्या काहिलींचा फळ्यासारखा उपयोग करणे व खडूची उणीव कोळशाने भरून काढून आपला शिक्षणाचा वर्ग चालू ठेवणे, यात काहीतरी नवीन आहे. स्त्रियांनी भाकरीच्या तव्यांचा पाट्यासारखा उपयोग करणे, रानात जाणाऱ्या प्रौढ गुराख्यांनी म्हशींच्या पाठीवर अक्षरे लिहून अभ्यास चालू ठेवणे, लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांजवळ, काका-मामाजवळ 'शिक्षण घ्या, लिहावाचायला शिका' म्हणून हट्ट धरून बसणे, या दृश्यात चैतन्य नाही असे कोण म्हणेल?

वडाची वाडी......

सायंकाळची वेळ होती. सायकवरून एका ग्रामगौरव साजरा झालेल्या गावाकडे निघालो होतो वाटतेच सोसाट्याच्या वाऱ्याने व त्या मागोमाग आलेल्या वळीवाच्या पावसाने झोडपण्यास प्रारंभ केला. पुढे जाणे अगदी अशक्य झाले, म्हणून वाटेतल्या एका लहानशा वाडीकडे वळलो व देवळात आसरा घेतला. दिवसभर काहीच काम झाले नव्हते ; नवीन काहीच पहायला मिळाले नव्हते आणि ठरलेल्या कार्यक्रमात पावसाने हा व्यत्यय आणला ! मन जरा नाराजच झाले. मग विचार आला, हीच वाडी का पाहू नये ! ठरलेले गाव नाही तर नाही, वाटेवर सहज भेटलेल्या गावात जे दिसेल तेच खरे. म्हणून चौकशीला सुरुवात केली. सगळी कर्ती मंडळी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती असे समजले. मग होती-नव्हती ती जुनी म्हातारी माणसे देवळात बोलावून घेतली. वर्ग या गावात दोन महिने चालू होता. पुढे बंद पडला; पण पुन्हा चालू व्हावा असे गावकऱ्यांना वाटते. कंदिलाची अडचण पडली असे कोणी म्हणाले. ' कंदिल-रॉकेलसाठी पंचवीस रुपयांपर्यंत खर्च करा, सरकार ती रक्कम देईल, असा कलेक्टरांचा ग्रामपंचायतींना हुकूम असताना ही अडचण का भासावी ?' असा मी प्रश्न केला. पंचायत उदासीन, शिक्षकाला ही सोय माहीत नाही, गावकरी अज्ञानात अशी परिस्थिती. तरीही वडाच्या वाडीला दोन महिने वर्ग चालू होता, ही घटना मला खरी अर्थपूर्ण वाटली. इथे जमलेल्या प्रौढांपैकी एकासमोर सहज मी एक कागदाचा तुकडा टाकला. माझे पेन त्याला दिले. लाजत लाजत, आढेवेढे घेत त्याने आपले नाव माझ्यासमोर कागदावर लिहिले. बाकी सारे तो विसरला होता. पण नाव, गाव पत्ता तरी लिहू शकला. जे पहावयाचे ते पावसामुळे हुकले होते, तरी जे पहायला मिळाले ते काही कमी चांगले नव्हते. शिक्षणाचा मंत्र येथे घुमला होता. येथेही ज्ञानदीपाचा प्रकाश काही काळ उजळला होता. मोहिमेच्या फलश्रुतीचा खरा पुरावा हाच. तो या वाडीने

। ९ ।