पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/162

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जो अधिक लाच देतो त्यालाच खात्रीचा व भरपूर पाणीपुरवठा केला जातो. यामुळे कूप सार्वजनिक असेल तरी त्यांचे सर्व फायदे मूठभर श्रीमंत शेतकरीच फक्त उपटत आहेत. लहान गरीब शेतकरी हवालदिल होण्यापलिकडे फारसे काही करू शकत नाही.

पण असे मोघमात लिहिणे कशाला ?नलिका कूप क्रमांक ३८१ व ३८२ या ठिकणी समक्षच जाऊन परिस्थिती आपण थोडी जवळून पाहू.

मौजीपूर आणि रामपूर या आपल्या गोविंदपूर केंद्राजवळच्या दोन गावातील हे दोन सरकारी नलिका कूप. या दोन्ही कूपांचे काम पहाणारा एक ऑपरेटर-यंत्रचारी व त्यांच्या हाताखालील एक मदतनीस-कूपरक्षक.

रामपूरला पाणी देणारा कूप सारखा नादुरुस्तच होता. यंत्रचा-याचे हात ओले केल्याशिवाय कूपातून पाणी वर येऊ शकत नाही. हे ज्ञान रामपूरच्या शेतक-यांना सुरुवातीला नसल्याने ते वरपर्यंत फक्त तक्रारी करीत बसले. शेवटी शेतातली उभी पिके वाळून चालली तेव्हा शेतक-यांना अवश्य ती ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर लगेच काही तासातच कूप दुरुस्त झाला. यंत्रचारी स्वतःच म्हणे खांबावर चढला होता व त्याने तारा जोडून दिल्या.

कूप ३८१ ची कथा थोडी निराळी आहे. सहा गावातील सुमारे चारशे एकर जमिनीला या कूपातून सरकरी वाटपपत्रकाप्रमाणे पाणी मिळायला हवे. पण सगळे पाणी मौजीपूरचे बडे शेतकरी हडप करीत असतात. या शेतक-यांची एकूण जमीन फक्त ११६ एकर. इतर पाच गावातील सुमारे तीनशे एकर जमिनीला पाण्याचा एक थेंबही हे शेतकरी पोचू देत नाहीत. यावरून गावागावात तंटे-मारामाच्या झाल्या. पोलिसांपर्यत तक्रारी गेल्या. पण परिस्थिती जैसे थे.

यंत्रचारी या शेतक-यांना आतून सामील असल्याशिवाय हे कसे घडू शकते ? आतूनच काय, यंत्रचारी काही प्रसंगी बाहेरूनही प्रत्यक्ष हातभार लावतो असे कळते. इतर ठिकाणी पाणी नेणारे चरच मोडून काढ, विद्युत उपकरणे बिघडवून ठेव, शेतक-याशेतक-यातच लठ्ठालठ्ठी लावून दे , अशा यांच्या कारवाया सुरू असतात.

गोविंदपूर क्षेत्राला सरकारी वाटपपत्रकाप्रमाणे २७ एप्रिल १९६८ ते ८ जून १९६८ या कालावधीत पाण्याचे चार हप्ते - एकूण ६६ तास पाणी मिळायला हवे होते. पण जेमतेम एक हप्ता पदरात पडला-इकडे कडक उन्हाने पिके वाळून चालली होती तरी हा हप्ता पदरात पाडून घेण्यासाठी थोडी दंगामस्ती करावीच लागली. यंत्रचा-याने नेहमीप्रमाणे कूप नादुरुस्त ठेवला होता. थोक दाराने-शेतक-यांचा लोकनियुक्त प्रतिनिधी स्वतः थोडी खटपट करून तो चालू केला. गोविंदपूरचे पाणीवाटप पूर्ण

                               । १५५ ।