पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा आशावाद पुढे चुकीचा ठरला हे वेगळे. पण भा. क्रां. द. कडे सुरुवातीच्या काळात या दृष्टिकोनातून पहाणारे इकडच्या भागात अनेकजण होते, हेही खरे. 'बिजनौर टाईम्स'चे संपादक श्री. बाबुसिंह चौहान हे अशा अनेकांपैकी मला भेटलेले एक जाणकार. आर्चाय नरेंद्र देव, लोहिया यांच्या तालमीत तयार झालेले हे समाजवादी पक्षाचे एक जुने कार्यकर्ते. काही काळ कम्युनिस्ट पक्षातही हे होते. गेली काही वर्षे मात्र केवळ पत्रकारिता. उत्तर प्रदेश, काँग्रेस राजवटीच्या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणून भाक्रांदकडे यांनी प्रथम प्रथम मोठ्या आशेने पाहिले. पहिल्या मध्यावधी निवडणुकीत भाक्रांद उमेदवारांचा जोरदार प्रचारही केला. अपेक्षित कोंडी फुटली असे यांचे मत. गुप्ता-त्रिपाठी टोळीपेक्षा चरणसिंग यांना परवडले होते. चालू लोकसभा निवडणुकीत मात्र उजव्या कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणानुसार यांनी इंदिरा काँग्रेसचा पाठपुरावा केला. गंमत अशी की, यांचे जोडीदार श्री. कश्यप स्वतंत्र पक्षाचे हितचिंतक. ' बिजनौर टाईम्स ' हे दैनिक दोघे मिळून मोठ्या हिरीरीने, गुण्यागोविंदाने चालवीत असतात. मी म्हटलेसुद्धा विनोदाने, अजब आहे तुमची ही युती. स्वतंत्र आणि कम्युनिस्ट वृत्तपत्रक्षेत्रात सहकारी म्हणून वावरताना मला प्रथमच येथे आढळले. हा काय या मातीचाच गुण समजायचा की काय ? खैर, जिस देश मे गंगा बहती है......

'जमीनदारी असताना जमीनदाराव्यतिरिक्त पूर्वी गरीब शेतक-याला पटवारी आणि पोलीस लोकच फक्त लुबाडत असत. पण अलीकडे ग्रामसेवक, कामदारसहकार आणि पाणीवाटप खात्यातील कर्मचारी-हीही मंडळी या टोळीत सामील झालेली आहेत. ही एक नवीच टोळधाड ग्रामीण भागावर कोसळत आहे...'

एका गाजलेल्या लेखाची ही सुरुवात. लेखाचे शीर्षक आहे 'लुटारू'- Bandits एका सरकारी खात्यातील भ्रष्टाचारावर संपादक तुटून पडलेला आहे. लेखणी बंदुकीसारखी रोखली गेलेली आहे.

बिजनौर जिल्ह्यात नलिका कूप खात्याची वाढ बेसुमार झालेली आहे. खाजगी नलिकाकूपांव्यतिरिक्त जवळजवळ चारशे सरकारी नलिकाकूप या जिल्ह्यात आहेत. म्हणजे चारशे नोकरांना चरण्यासाठी ही चारशे सरकारी कुरणे जिल्ह्यात नव्याने तयार झालेली आहेत. सरकारी नलिका कूप ही जणू काय आपल्या बापाची मालमत्ता आहे असे समजून हे चारशे लुटारू तिचा मुक्तपणाने उपभोग घेत आहेत. सर्वसामान्य शेतकरी या लुटमारीच्या सुळसुळाटामुळे भयंकर हैराण झालेला आहे. वरपर्यंत लटीचे हिस्से बरोबर पोचवले जात असल्याने कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्या काही दाद फिर्यादच लागत नाहीत.