पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढी तयारी झाली की, प्रौढ पहिल्या कसोटीला लायक ठरत. परीक्षा घेण्याबद्दल शिक्षकांकडून भाग शिक्षणाधिकाऱ्यांकडे सूचना केली जाई व त्याप्रमाणे अधिकारी गावात जाऊन प्रौढांच्या परीक्षा घेत असत. ज्या ठिकाणी सर्व गावातील निरक्षर स्त्री-पुरुष पहिल्या कसोटीत उत्तीर्ण होत असत, तेथे एखादा, ‘ग्राम गौरव' समारंभ साजरा केला जाऊन त्यात साक्षरता टिकविण्याबद्दल गावर्यांकडून प्रतिज्ञा घेतल्या जात. हा कार्यक्रम म्हणजे गावशिक्षण मोहिमेचा जणू शेवटचा टप्पाच होय.

ग्रामगौरवांचे काही आकडे

ग्रामगौरव पदवीस पोहोचलेल्या गावांची संख्या जिल्ह्यात एकूण २००-२५० च्या घरात असावी. सातारा जिल्ह्यात सुमारे १४००-१५०० गावे येतात. याचा अर्थ शेकडा १० ते १५ या प्रमाणात संपूर्ण गाव साक्षर करण्याची मोहीम सध्या यशस्वी झाली आहे असा होतो. क-हाड, पाटण, कोरेगाव इत्यादी पुढारलेल्या तालुक्यात शेकडा २५ ते ३० टक्के यश पदरात पडलेले आहे, तर जावळी, परळी या भागात तुरळक ठिकाणीच ग्रामगौरव अद्यापपर्यंत साजरे होऊ शकलेले आहेत. पण केवळ ग्रामगौरवांचे आकडे फारसे मार्गदर्शक ठरणार नाहीत. जेथे संपूर्ण गाव साक्षर झालेला आहे अशा काही ठिकाणी तरी ग्रामगौरव समारंभ व्यावहारिक अडचणींमुळ साजरे होऊ शकलेले नाहीत, हे एक कारण ; गाव साक्षर झालेले आहे, परंतु परीक्षा घेण्याची सोय होऊ न शकल्याने त्याची नोंद मात्र ‘साक्षर' म्हणून झाली नाही, हे आणखी एक कारण. दुसऱ्या बाजूला घाईघाईने परीक्षेचे नाटक उरकून ग्रामगौरव पदरात पाडून घेतल्याचे प्रकारही झालेले आहेत; तर एका ठिकाणी गावच्या एकूण लोकसंख्येपेक्षा साक्षर मंडळींची संख्याच अधिक दाखविण्याचा विक्रमही करून दाखविण्यात आलेला आहे !!

तवे, काहिली, कोळसे......

ग्रामगौरव समारंभाच्या आकड्यांवरून या मोहिमेचे यशापयश मोजणे म्हणूनच घातुक आहे. जिल्ह्यात २००-२५० गावे साक्षर झालेलीही असतील. पण या देखाव्याला फारसा अर्थ नाही. अर्थ आहे तो याला की, मोहिमेच्या काळात जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी निदान दोन महिने तरी समाजशिक्षणाचे वर्ग उघडण्यात आले व असंख्य ग्रामस्थांनी त्यात भाग घेतला. शिक्षणाचे तुफान दोन महिने या जिल्ह्यात उफाळत होते हे एक सत्य आहे. जावळी या डोंगराळ व मागासलेल्या तालुक्यात, जेथे गाव गाठायचा म्हणजे सात-सात, आठ-आठ मैल पायपीट करावी लागते अशा दुर्गम भागात, एकाकी शिक्षक, रात्रीच्या

। ८ ।