पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खात्यातील सेवक म्हणा, एखादा सामाजिक कार्यकर्ता म्हणा, यापैकी कुणीतरी एखादी तरी प्रचारसभा या कालावधीत भरविलेली आढळून येते. सभा घेणाऱ्यांच्या प्रभावी प्रचारतंत्रावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून रहात. शिक्षणाचे सर्वसाधारण महत्त्व, देशाची गरज, इंग्लंड-फ्रान्स-जर्मनीची उदाहरणे या प्रकारच्या मोघम वक्तृत्वाचा काहीही उपयोग होत नसे. पण कोणी जुन्या धार्मिक, ऐतिहासिक स्मृतीचा धागा जोडला, व्यावहारिक दाखले भरपुर दिले, तर असल्या आवाहनांचा चटकन प्रभाव पडे. स्त्रियांच्या एका सभेत प्रचारक सांगतो-'गोकुळअष्टमीचा उत्सव साजरा करता; कृष्णाचा पाळणा सजवता; पाळण्यात नसलेल्या कृष्णासाठी गाणी म्हणता; पण घरातल्या तुमच्या बाळकृष्णाला शिव्याशाप देता, त्याला हिडीसफिडीस करता. शिक्षण घेतले तर खरा बाळकृष्ण घरात आहे, पाळण्यात नाही हे तुम्हाला समजेल व त्याची वाढ कशी करावी हे आपोआप तुमच्या ध्यानात येईल. म्हणून रात्रीच्या शाळेला हजर राहा.' प्रौढ शेतकऱ्यांच्या सभेत हाच प्रचारक म्हणतो, 'वरच्या पांढरपेशा समाजातील मुले चटकन वरच्या वर्गात जातात. त्यांना चांगले गुण मिळतात. तुमचा बाब्या मात्र रखडत राहतो. का? बाब्याजवळ बुद्धी कमी आहे म्हणून नाही; तर शाळा संपल्यावर बाब्याच्या अवतीभवती, घरीदारी शिक्षणाचे वातावरण नाही. त्याला चांगले संस्कार इतर वेळी मिळत नाहीत. पांढरपेशा, सुशिक्षित समाजातील मुलांना या वातावरणाचा फायदा मिळतो म्हणून ती चटकन् पुढे जातात. आपली मुले मागे रहातात. आपल्या मुलांनी पुढे यावे असे वाटत असेल, तर आईबापांनी प्रथम शिकले पाहिजे; घरातील वातावरण सुशिक्षितपणाचे ठेवले पाहिजे. म्हणून शिक्षणाच्या वर्गात सर्वांनी दाखल व्हा. स्वतःसाठी नाही; आपल्या मुलाबाळांसाठी.'

गावसमित्या आणि गृहवर्ग

प्रचार सभेमुळे वातावरण निर्माण झाले की, प्रत्यक्ष कार्याच्या अंमलबजावणीसाठी बहुतेक ठिकाणी ल्हासुर्ण्याच्या वळणावर एखादी गावसमिती नेमण्यात येई. गावची लोकसंख्या, निरक्षरांची संख्या इत्यादी माहिती जमा झाली की, सोयिस्कर पडतील अशा पोटसमित्या स्थापन करण्यात येत. पोटसमित्या व मुख्य समिती यांनी वर्गासाठी जागा निवडणे, दिवाबत्ती, फळे, शिक्षणसाहित्य इत्यादी अवश्य बाबींचा पुरवठा करणे, प्रौढांना वर्गासाठी एकत्र करणे इत्यादी कामे करावीत अशी अपेक्षा होती. वर्ग चालविण्याची जबाबदारी मात्र मुख्यतः शिक्षकांवरच पडलेली होती. ज्या ठिकाणी शिक्षण कमी, निरक्षरता जास्त, तेथे वरच्या वर्गातील मुलांनीही शिक्षणाचे काम केले; शाळेतील मुलांनी घरच्या घरीच वर्ग भरवून घरातील निरक्षरांना शिक्षण देण्यासाठी 'गृहवर्ग' चालविण्याचा प्रयोगही काही ठिकाणी करण्यात आला. साठ दिवसांची हजेरी, जोडाक्षरविरहित अक्षरज्ञान, अंकलिपी

। ७ ।