पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रामयन


गणपत महादू चव्हाण. वय वर्षे अठ्ठावीस.

मुक्काम गंजाड. डहाणू तळासरी रस्त्यावरील एक गाव.

जव्हारच्या राजाने भूदान दिलेल्या जमिनीचे दहाजणात वाटप झाले. त्यातील ७ एकर ८ गुंठे जमीन गणपतच्या वाट्यास आली.

लक्ष्मीचंद मारवाडी या सावकाराने गणपतच्या वडिलांना पाचशे रुपये कर्ज दिलेले होते.

गेली दहा वर्षे गणपत या जमिनीतून पिकवलेले धान्य पाचशे रुपये कर्जफेडीपोटी सावकाराकडे नेऊन देत आहे. या धान्याची अंदाजे वर्षाकाठी होणारी किंमत दोनशे ते तीनशे रुपये.

या जमिनीपैकी काही भाग गवत कापणी व यंत्रासाठी व साठवणीसाठी एकाला भाड्याने दिलेला आहे. या जागेचे वार्षिक पन्नास रुपये भाड़े परस्पर लक्ष्मीचंद याचेकडे जमा होत आहे.

पाचशे पेंड्यांची गंजी. अशा पंचवीस गंज्या गवत लक्ष्मीचंदला गणपत सालोसाल देत आहे.

गणपत आपली गाय घेऊन गेल्या वर्षी लक्ष्मीचंदकडे गेला. गाय घ्या आणि हिशोब मिटवून टाका असे त्याने लक्ष्मीचंदला सांगितले.

लक्ष्मीचंदने गाय घेतली. पण बाकी काढली रुपये तीनशे !

तीन ते चार हजार रुपये मालरूपाने किंवा रोख सावकाराकडे पोचते झाले; पण गणपतचे पाचशे रुपयांचे कर्ज आठ-दहा वर्षे उलटली तरी फिटलेले नाही.

गणपतला जमीन मिळली. तो ती राखू शकला नाही. दहा वर्षांपूर्वी तो जसा आणि जिथे होता तसा आणि तिथेच आज तुकडे मोडीत जगतो आहे.

गणपत सारखाच तो राह्या वनशा कोल्हा.

। १३३ ।