Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कार्यक्रम यथास्थित पार पडला. पुढे ज्ञानदीप प्रज्वलित करून सर्वांनी साक्षरता टिकविण्याबद्दल शपथा घेतल्या आणि पवार-मोहिते यांच्या भाषणांनी सभा संपली. 'कृष्णाने नरकासुर मारला तसा ल्हासुर्ण्याच्या जनताजनार्दनाने अज्ञानासुर मारला! धन्य धन्य ल्हासुर्णे !' हे पवारांचे उद्गार आजही गावकरी येणा-याजाणा-याला मोठ्या अभिमानाने सांगत असतात, एवढा हा समारंभ संस्मरणीय होता, नेत्रांचे पारणे फेडणारा होता.

नव्या मोहिमेची दोन वैशिष्ट्ये

ल्हासुर्ण्याच्या यशामुळे आसपासची कुमठे, शिरढोण, चिमणगाव, पडवळे, सासपडे इत्यादी दहा-पाच गावे भारून गेली व तेथेही समाजशिक्षणाची लाट उसळली हे तर खरेच ; पण या यशाचा मुख्य परिणाम अधिकारीवर्गावर झाला हे विशेष आहे. ल्हासुर्ण्याच्या आदर्शाप्रमाणे साऱ्या जिल्ह्यातच कार्याचा डोंब उसळून टाकण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांच्या मनःश्क्षुचसमोर तरळू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी हालचालींना आरंभही केला. समाजशिक्षणाच्या या नव्या पर्वाची दोन मुख्य लक्षणे होती. यापूर्वी हे कार्य प्रामुख्याने शाळाखात्यामार्फतच जे चालू होते, त्याऐवजी आता सरकारची इतरही खाती आपापला हातभार लावण्यास पुढे सरसावली. शेतकी, पोलीस इत्यादी खात्यांचे सहकार्य जरी अपेक्षित असले तरी वस्तुतः महसूल खात्यानेच शिक्षकांच्या खालोखाल जबाबदारीचा वाटा उचलला हे या पर्वाचे एक वैशिष्टय. तुरळक ठिकाणी समाजशिक्षणाचे वर्ग चालवून जमतील तेवढे निरक्षर साक्षर करण्याचा पूर्वीचा कार्यक्रम बदलून शंभर टक्के साक्षरतेचे, दोन महिन्यात संपूर्ण गावातून निरक्षरतेचे उच्चाटन करण्याचे निश्चित उद्दिष्ट यापुढे डोळ्यांसमोर ठेवण्यात आले, हे या मोहिमेचे दुसरे एक वैशिष्ट्य होते! या उठावाच्या उद्दिष्टामागील प्रेरणा कोणत्या होत्या त्या निश्चित सांगता येत नाहीत. कदाचित् १९६१ च्या जनगणनेच्या वेळी सातारा जिल्हा शिक्षणाच्या दृष्टीने भारतातील सर्व जिल्ह्यात आघाडीवर नोंदला गेला पाहिजे, ही सार्थ प्रादेशिक अभिमानाची प्रेरणा यामागे असेल; किंवा एखाददुसऱ्या अधिका-याच्या वैयक्तिक उन्नतीच्या मर्यादित योजनाही त्याच्या बुडाशी असतील. उद्देश भिन्नभिन्न स्वभावधर्माप्रमाणे भिन्नभिन्न पातळीचे राहणारच. परंतु एक चांगले उद्दिष्ट ठरले व त्याप्रमाणे कामाला आरंभही झाला ही वस्तुस्थिती मात्र स्वच्छ आहे.

गावशिक्षणमोहिमेचा श्रीगणेशा

कवठे या गावी नामदार श्री. मोरारजी देसाई यांच्या हस्ते दि. १ नोव्हेंबर १९६० रोजी गावशिक्षणमोहिमेचा नारळ फुटला. प्रचारसभा हा मोहिमेचा पहिला टप्पा. जवळजवळ सातारा जिह्यातील प्रत्येक गावात सरकारी अधिकारी म्हणा, शिक्षण

। ६ ।