पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कलेक्टरांना झालेले दर्शन

व्यवस्था आखून झाल्यावर कामासही तेवढ्याच तडफेने सुरुवात झाली. ल्हासुर्णे हे गाव कोरेगाव स्टेशनपासून दोन मैल अंतरावर येते. शाळेतील काही शिक्षक कोरेगावाहून ल्हासुर्ण्यास रोज येत असतात. वर्ग सुरू झाल्यावर त्यांना रोज दोन वेळा यावे-जावे लागत असे व त्यामुळे चार महिने त्यांना असह्य ताण सहन करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. गावातच राहणा-या शिक्षकांना तर चोवीस तासही अपुरे पडत. कंटाळा हा शब्दच गावकरी त्यांना उच्चारू देत नसत. रात्री दोन दोन वाजेपर्यंत वर्ग चालू रहात होते. वर्गा-वर्गामध्ये स्पर्धा लागून राहिल्या होत्या. भितीभितींवर म्हणी व बोधवचने लिहिली गेली होती. अधिका-यांच्या खेपा चालू झाल्या, तेव्हा त्यांना सारा गाव गाण्यांनी, कवितांनी व अभंगांनी अक्षरशः घुमत असल्याचे विलक्षण दृश्य पहावयास मिळाले. प्रत्यक्ष कलेक्टरमजकूर दोन तीन वेळा न सांगता एकदम रात्रीच्या वेळी गावात हजर झाले होते म्हणे! वर्गावर्गातून ते हिंडले. कुठे त्यांना गाणी ऐकायला मिळाली, कुठे एखादी नवसाक्षर महिला धार काढण्यावर भाषण देताना पहायला सापडली, तर एका ठिकाणी कलेक्टरांनाच 'आपली ओळख करून द्या' म्हणून सांगणारी खेडवळ पण शिक्षणाचे वारे प्यालेली एक बाई आढळून आली. चार महिने शिक्षणाचा एक प्रचंड डोह गावात उसळत होता. त्याच्या पवित्र निनादाने येणारे-जाणारे लहानमोठे पाहुणे स्तिमित होत होते. त्याच्या उसळणा-या लाटा आसपासच्या पाच-दहा गावातून तर वाहू लागल्याच; पण सारा सातारा जिल्हाच या लाटांवर स्वार होणार की काय, अशी चिन्हेही दिसू लागली.

ल्हासुर्ण्याने अज्ञानासुर मारला

दि. १० सप्टेंबर या दिवशी या समाजशिक्षण मोहिमेची सांगता झाली. एक हृदयस्पर्शी समारंभ या निमित्ताने गावात घडून आला. गावातील घरांच्या भिंती नव्याने रंगविण्यात आल्या होत्या. रस्ते झाडून स्वच्छ ठेवण्यात आले होते. सडासंमार्जने व रांगोळ्या यामुळे गावाला प्रसन्न शोभेची एक नवीनच झळाळी चढली होती. नवलाई देवीसमोर सभा भरली. शिक्षणाधिकारी श्री. पवार व कमिशनर श्री. मोहिते यांच्यासारखी बड़ी मंडळी पुण्याहून या समारंभासाठी मुद्दाम आली होती. पाहुण्यांना मिरवणुकीने सभास्थानी आणण्यात आले. सर्व सभा नवसाक्षर महिलांनीच चालविली. एकीने अध्यक्षांची सूचना मांडली; दुसरीने तिला अनुमोदन दिले. तिसरीने गाव-शिक्षणाची माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल चौथी बोलली. गावाने श्रमदानाने केलेल्या कामाचे निवेदन पाचवीने केले. स्वयंपाकघर कसे असावे हे सहावीने सांगितले. शिक्षणाधिका-यांनी काहींच्या परीक्षा घेतल्या. तोही

। ५ ।