पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येथे रहात होती. मला बसायला घोंगडं वगैरे टाकून वाटाड्या आधीच आत गेला होता. त्याची काहीतरी खुडबुड सुरू होती. पण चहा वगैरे तर काही झालेला दिसत नव्हता. म्हणून गंमतीने मी सहज बोलत होतो.

गुळाचा चहा मला कसा द्यायचा म्हणून बहीण अडखळली होती. घरात साखरेचा दाणाही नव्हता.

असेच हे लोक वर्षानुवर्षे येथे रहात आहेत. कोणी चौकशीला येत नाहीत, जात नाहीत. माझ्यासारख्या अवचित येणाऱ्याजाणाऱ्यांवर त्यांचा विश्वासही नसतो. वाटाड्या सांगत होता, असे एकदम कोणी आले की हा सरकारी माणूस काहीतरी माहिती गुप्तपणे काढायला हिंडतोय, अशीच या माणसांची प्रथम समजूत होते. त्यामुळे खरे दुःख सहसा सांगायला ती तयार होत नाहीत. मी त्यांच्या ओळखीच्या नात्यातल्या माणसाबरोबर आलो होतो. म्हणून बक्कन ती म्हातारी गांडूळ ओकून मोकळी झाली होती.

सकाळपासून मी अशा दोन वस्त्यांवर थांबलो होतो. एकच रड, तीच ओरड. पाणी नाही, पाणी नाही. हे तर ऐन थंडीचे दिवस होते. तरी लांबून पाणी आणायला सुरुवात झाली होती. उन्हाळ्यात तर थेट किल्ल्यावर जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठीही. गुरं कुठे न्यायची ही काळजी आतापासूनच लागली होती. म्हणून या वस्त्या ओस पडत चालल्या होत्या, जवळजवळ पडलेल्याच होत्या. दोन-चार झोपड्या-गोठेच ते ! म्हातारं माणूस आणि गुरे वळण्यासाठी ठेवलेली एक-दोन मुले ! पूर्वी वेगळं होतं. काहीतरी उद्योग हाताशी होता. मुख्यतः गुरं सांभाळण्याचा. चारा पाण्याची सोय होती. आता डोंगर उजाड झाला, पाणी आटले. माणसे उद्योगासाठी शहरात पळाली. कुणाची हातगाडी, कुणी स्टेशनवर हमाल, ऑफिसमधील शिपाई, असा जो तो कुठेकुठे चिकटला आणि झोपडपट्टयांच्या ढिगाऱ्यात हळूहळू दिसेनासा झाला. शहरात बसून, सचिवालयात बैठक बोलावून आम्ही झोपडपट्टी निर्मूलनाच्या योजना आखीत आहोत, त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे वगैरे निघतात. याने हा प्रश्न कधी सुटणार आहे का ? हा ओघ जिथून निघतो, तिथेच तो अडवला पाहिजे. रोगाचे मूळ उपटले पाहिजे. हे वाटते तितके अवघड नाही. फक्त दृष्टी हवी. कार्यक्षम यंत्रणा हवी. डोंगरावरची शेती, बागायती वाढवली पाहिजे. दगडधोंड्यांनी भरलेल्या उतरत्या निकृष्ट जमिनीत आबा करमरकरांसारखा उपक्रमशील शेतकरी ज्वारीचे विक्रमी पीक घेऊ शकतो, मी हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. इथे, या डोंगरांवर मग काही पिकू शकणार नाही ? खाजगी जंगलांच्या लागवडीचा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. पशुधनाच्या विकासाची एखादी योजना येथे यशस्वी होऊ शकेल. बांबूची वने येथे माजावीत, आंबा-काजूच्या बागा येथे डोलाव्यात. समोर पानशेतचा

। ११७ ।