पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विस्तीर्ण जलाशय आहे. खडकवासला जवळ आहे. उद्या वरसगावचे धरण तयार होईल. वर गडावर पाण्याची टाकी आहेत- आणि येथे वस्तीला माणूस राहू शकत नाही ! कमरेत वाकलेल्या ऐंशी वर्षांच्या म्हातारीला दोन-दोन मैलांवरून पिण्याचे पाणी वाहून आणावे लागते ! गांडुळे कुठली तर मग ? ही माझ्यासमोर चिडून बोलणारी हाडामांसाची माणसे की, दिल्ली-मुंबईतल्या एअरकंडिशन्ड खोल्यात बसून यांच्या विकासाच्या योजना आखणारे थोर थोर नेते ? त्यांचे सचीव, उपसचीव? त्यांच्यासाठी अहवालांचे ढीग रचणारे बडे बडे विद्वान, तज्ज्ञ, जाणकार ?

याच परिसरात तो तपस्वी भागवत आपले प्रयोग करीत करीत झिजून मेला. पण या तथाकथित संशोधकांना, अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना तिकडे ढुंकूनही पाहण्याची कधी बुद्धी झाली नाही. भागवत एस्. आर. एकांडे होते, हेकट होते, लोकांचे आणि त्यांचे यामुळे कधीच जमू शकले नाही हे खरेच; पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न मूलभूत समजून त्याचा काही अधिक पाठपुरावा होऊ नये, हा त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे. ज्या भागात डोंगरमाथ्यावर दीडशे-दोनशे इंच पाऊस पडतो तेथे तळाशी राहणाऱ्या लोकांना वर्षातून तीन-चार महिने पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकावे लागावे, हा विरोधाभास त्यांना खटकला, ही विसंगती त्यांना बोचली आणि एकट्याच्या बळावर हा विरोधाभास, ही विसंगती कमी करण्याचा त्यांनी दहा-बारा वर्षे सतत प्रयत्न केला. डोंगरउतारावर ताली घालता घालता त्यांच्या हाडाची काडे झाली, रहात्या घरादारासकट सर्व संपत्तीची धुळधाण उडाली. किती शेतीतज्ज्ञांनी, जलसंशोधकांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा हा प्रयोग समजावून घेतला, त्यातील उणीवा दूर करून अधिक शास्त्रीय पायावर, व्यापक प्रमाणावर तो यशस्वी व्हावा यासाठी धडपड केली ? बहुतेक धेडांनी त्यांची त्या वेळी टिंगलटवाळीच केली. केंद्रीय मंत्री के. एल्. राव यांचा अपवाद वगळता एकही मंत्री इकडे फिरकलादेखील नव्हता त्या काळात. दोन इंच पाऊस पडणाऱ्या भागात इस्रायलने नंदनवने कशी फुलवली यावर रसभरीत व्याख्याने मात्र दिली गेली-दिली जातातही; तो चमत्कार अभ्यासण्यासाठी येथून तज्ज्ञांची टोळकी तिकडे पळत असतात. पण कुठल्याही देशाची प्रगती असे दुसऱ्याचे पाहून, अनुकरण करून होत नसते. त्यासाठी स्वतंत्र प्रश्न उपस्थित करणारे संशोधकच लागतात. आपल्या आसपासचे विरोधाभास कुठेतरी, कुणालातरी बोचावे लागतात. विसंगती खटकावी लागते. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी वडिलांना गीता वाचून दाखवीत असताना सुरुवातीला शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन अठराव्या अध्यायाच्या शेवटी ज्या अर्थी युद्धाला प्रवृत्त झालेला दिसतो, त्या अर्थी गीतेत संन्यासाचे प्रतिपादन नसावे, दुसराच काहीतरी गीतेचा संदेश असावा, अशी शंका एखाद्या बाळ गंगाधराला येते आणि नंतर स्वतंत्र संशोधनाच्या वाटेने जाता जाता अखेरीस तो गीतारहस्याचा निष्काम कर्मयोगाचा उद्गाता होऊन जातो. भौतिक शास्त्रातील संशोधनाची

। ११८ ।