पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिंहगड, पाठीमागून



‘परवा तुमची सारखी आठवण येत होती' सायकलवरून येणाऱ्या आमच्या पूर्वीच्या पवार दूधवाल्यांना थांबवून मी म्हटले.

घागरी रिकाम्या करुन ते आता परत गावाकडे निघालेले होते. पुण्यापासून दहा बारा मैलांवर, सिंहगडच्या पायथ्याशी वसलेले गो-हे हे त्यांचे गाव. रोज सकाळी सायकलीला घागरी बांधून पुण्याला यायचे, दिवसभर रतीब घालायची, संध्याकाळी मुक्कामाला गावाकडे. रोज पंचवीस-तीस मैल सायकलिंग तर सहजच होत असावे. ऊन नाही, वारा नाही, पाऊस काळात तर भिजत, वाहते ओढे ओलांडून यायचे-जायचे ! वर्षानुवर्षे हा त्यांचा क्रम सुरूच आहे.

‘का बुवा ? आमची आठवण व्हायचे कारण ? ' सायकलवरून उतरून पवारांनी मला विचारले.
‘तुमच्या गावावरून परवा गेलो. डॉक्टर (पळसुले)-तुम्ही-आम्ही मागे तोरण्याला गेलो होतो तसेच !' मी.
'मग घराकडे आला नाहीत ?' पवार.
'थोडी वाट वेगळी पडली.' मी
'कसे गेलात ? '
'अगदी अचानकच ठरलं. मला वेल्ह्याला जायचं होत. सकाळी स्टॅडवर गेलो. जत्रेचा दिवस असल्याने गाडीला फार गर्दी होती. मनाने तर घेतले होते, आज वेल्ह्याला जायचेच. शेजारी सिंहगडची एस. टी. रिकामी उभी होती. आठवले, दहा-बारा वर्षापूर्वी आपण तिघेजण सिंहगडला वळसा घालून पायी वेल्ह्याला पोचलो होतो पंधरा-सोळा मैलाची चाल पडली होती. म्हटलं, बघू पुन्हा जमतं का. म्हणून सिंहगड गाडीत बसलो.' मी.
'उतरलात कुठे ? वाट कुणी दावली ?'

आपली पूर्वीची वाट वेगळी होती. डोंजाला उतरून आपण रात्री तुमच्या घरी मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खानापूरवरून, पाब्याची खिंड ओलांडून

। ११५ ।