Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून 'हिंदू' शब्दाला मान्यता लाभेल हे संभवनीय दिसत नाही. सर्व मुसलमान, खिस्ती, धर्म बदलून हिंदू होतील याचीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत चालकांची भूमिका काय राहील ? समजा वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरायचा आहे. प्रवेशेच्छू आपला धर्म म्हणून मुसलमान-खिस्ती असे काहीतरी नोंदविल. चालक ते खोडून त्याजागी हिंदू हा शब्द लिहितील. प्रवेशेच्छूला हे मान्य होणार नाही. मग त्याला प्रवेश तरी नाकारला जाईल, किंवा चालकांना आपले धोरण तरी बदलणे भाग पडेल. धोरण बदलून मुक्त प्रवेशाला वाव दिला गेला तर वसतिगृह हे एकात्म राष्ट्रनिर्मितीचे एक आशास्थान ठरेल, फक्त हिंदूंनाच प्रवेश चालू राहिला तरीही त्यात गैर काहीच नाही. हिंदुधर्मांतर्गत अस्पृश्यतेला, उच्चनीचतेला येथे मूठमाती मिळत आहे, हेही यश काही थोडे नाही. अस्पृश्यता, उच्चनीच भाव हटवला पाहिजे हे सर्वांनाच आज मान्य आहे. पण यासाठी व्यवहार्य कार्यक्रम मात्र कोणालाच सादर करता आलेला नाही. बडबड मात्र उदंड माजली आहे. यापेक्षा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न शतपटीने श्रेष्ठ आहे. मला खूप वाटते, की 'विश्व हिंदू परिषद' ही 'विश्व मानव परिषद' व्हावी. सर्वांना उद्याच्या मानवधर्माचे शिक्षण येथून लाभावे. पण काही कारणास्तव आज हे घडू शकत नसेल, तर जे मजबूत यश पदरात पडते आहे ते मर्यादित म्हणून झिडकारावे, नाकारावे असेही मला वाटत नाही. तो एक नतद्रष्टपणा ठरेल. पुरोगामित्वाच्या पोकळ बडेजावासाठी मी तो करणार नाही.


*


जानेवारी १९७०

। ११४ ।