पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जेवण माहीत नाही असा आदिवासी नव्या चवींना हळूहळू सरावतो. संस्कृती म्हणजे तरी अखेर काय ? चव बदलणे, अभिरुची सुधारणे, एवढेच ना ?

असे गुरुजी घरी आले, की ताडीमाडी पुढे करून त्यांचे स्वागत करू नये हे आदिवासीलाही कळते. नाहीतर केवढा समरप्रसंग ? असे स्वागत एखाद्याने नाकारले, तर चहा नाकारल्याने आपल्याला जसा राग येईल तसाच तो आदिवासीलाही येतो. लग्नात दारू पाजली नाही म्हणून रुसणी-फुगणी, मानापानाची भांडणे सर्वसामान्य आदिवासी घरात चालूच असतात. नवी पिढी, नवे संस्कार हाच यावरील उपाय आहे.

वसतीगृहातील पुस्तकांचा संग्रहही निवडक वाटला. Exodus कादंबरीचे ‘शूरा मी वंदिले' हे नुकतेच प्रसिद्ध झालेले मराठी रूपांतरही मला गुरुजींच्या टेबलावर दिसले. यापूर्वी मी न पाहिलेले व ऐकलेले एक पुस्तक मात्र मीच या संग्रहातून परतबोलीचा शब्द देऊन उचलून आणलेले आहे- भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : लेखक-विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. नागपूरच्या नवभारत ग्रंथमालेचे १९३३ मधील प्रकाशन.

'या वसतीगृहात कोणाला प्रवेश मिळू शकतो ?' मी
'या विभागात राहणाऱ्या आदिवासी-वनवासी कुटुंबातील कुणाही मुलाला-'चालकांचा खुलासा.
वसतीगृह 'विश्व हिंदू परिषदे'चे आहे. त्यामुळे मी आणखी एक चौकशी केली. या विभागात ख्रिश्चन झालेल्यांचे प्रमाण पुष्कळच आहे. मुसलमानही असतील. म्हणून मी विचारले, 'सगळ्यांना प्रवेश दिला जातो का ?'
'या विभागातील सर्वांना आम्ही हिंदूच समजतो.' चालक.

उत्तर मोठे पेचबंद वाटले. आपण इतरांना काय समजतो यापेक्षा इतर आपणा स्वतःला काय समजून वागतात याला महत्त्व आहे. या विभागात रहाणाऱ्या प्रत्येकालाच हिंदू समजायचे म्हणजे हिंदुस्थानात रहाणाऱ्या प्रत्येकालाच हिंदू म्हणायचे. हिंदुत्वाची ही व्याख्या व्यवहार्य नाही. हिंदू हा शब्द राष्ट्रवाचक आहे, धर्मवाचक नाही हे सिद्ध करण्याचा सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथात प्रयत्न केला. ऐतिहासिक दृष्ट्या त्यांचे प्रतिपादन निर्दोषही असू शकेल. पण परंपरेचा संस्कार सुटत नाही. हिंदू हा शब्द धर्माशीच जोडला गेलेला आहे. 'भारतीय' हा सोज्वळ शब्दही येथे मान्य करण्यासाठी खळखळ सुरू आहे तेथे त्याचाच प्रतिशब्द


ग्रा.•••८

। ११३ ।