आहे. आल्यागेलेल्याचे स्वागत करून त्याची सगळी सोय पाहण्याचे अगत्य आहे. मला तर शहरातही इतके चांगले शैक्षणिक वातावरण आढळत नाही. आईबाप येऊन भेटून जातात. कुणी शेठ-सावकार येऊन खाऊ वाटतो. नुकताच गणेशोत्सव सुरू केला आहे. गावातले सर्वजण जमतात. अगदी ख्रिश्चन असलेले विद्यार्थीमित्र व त्यांचे पालकही. आरत्या होतात, प्रसाद वाटप होते. 'जास्तीत जास्त दोन वर्षात पळ काढतात की नाही ते पहा' हे या वसतीगृहाच्या चालकांबाबत लाल बावट्याच्या एका कार्यकर्त्याने काढलेले उद्गार निदान आज तरी खरे ठरलेले नाहीत. वसतीगृह वाढविण्याच्या चालकांच्या खूप योजना आहेत. सुरू होऊन दोन वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे.
असा हौशी गुरुजी तर कित्येक दिवसात भेटला नव्हता. फक्त मुलांच्या अभ्यासावर व आरोग्यावर लक्ष नाही. प्रत्येक मुलामार्फत थेट कुटुंबाशी संबंध. त्यातून नवे नवे कार्यक्रम. यंदा, ६९ मध्ये, या संबंधातून एक विहीर झाली. वसतीगृहातील एका विद्यार्थ्यांचे पाच मैलावरील गाव. घरची जमीन तीन-चार एकर. कुटुंबाची गरज ओळखून गुरुजींनी आपली विद्यार्थी फौज फावल्या वेळात तिकडे गुंतविली. आळीपाळीने सर्वच विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी या कुटुंबाच्या मदतीला जात. कोणावरही ताण न पडता विहीर चार-सहा महिन्यात तयार झाली. आता इंजिन-पंप वगैरे मिळवून देण्याची खटपट सुरू आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमाचे मोल करायचेच म्हटले तर ते सहज सात-आठशे रुपयांच्या घरात जाते. एक कुटुंब यातून स्वावलंबी होत आहे हा सगळ्यांचा आनंद. यंदा किती कुटुंबे अशी स्वावलंबी करायची ? किती ठिकाणी विहिरींची गरज आहे ? कितीजण स्वतः राबायला यासाठी तयार आहेत ?. पाण्याच्या जागा कशा नक्की करायच्या ? कोणकोणाला कामाला पाठविता येईल ? त्यांचा अभ्यासाचा वेळ कसा राखून ठेवायचा ? गुरुजींसमोर असेच काही प्रश्न नेहमी उभे असतात.
वसतीगृहाच्या बाजूला असलेला पाव एकराचा तुकडा वाया जाऊ नये म्हणून असाच एक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी भात लावला. जपानी पद्धतीचे शिक्षण सहजच मिळन गेले. निर्मितीशी, उत्पादनाशी लहानपणापासून नाते जडले. गुरुजींनी नोंद ठेवली. पिकांबाबत अंदाजाच्या स्पर्धा घेतत्या. चुका ध्यानात आणून दिल्या. आसपासची आणखीन् थोडी जमीन मिळवून यंदाही हा कार्यक्रम चालू ठेवण्याची सर्वांची उमेद दिसली.
विद्यार्थ्यांना सुटीत घरी जाताना काकडी, भोपळा, वांगी, निरनिराळ्या वेलांचे, भाज्यांचे बियाणे गुरुजी देतात. घरच्या दोन-चार एकरात मुले या भाज्या लावतात, पालक पुढे देखभाल करतात. गुरुजींची चक्कर असतेच. अधिक माहिती, नवे प्रकार यांची देवाणघेवाण चालू असते. शतकानुशतके भाताशिवाय ज्याला