पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ध्येयाशी एकरूप होऊन समाजातील विविध असे अन्याय ते खुलवून देतात किंबहुना या समग्र निवेदन शैलीत विविध अशी कवितेची आलेली अवतरणे मूळ आशयाला अधिक अर्थगर्भ करणारी झाली आहेत. लेखिकेचा याबाबतचा गद्य-पद्य विवेक कौतुकास्पद झाला आहे.
 पू.साने गुरूजी, डॉ.बापू काळदाते, एस.एम. जोशी, अनंत भालेराव, ना.ग. गोरे या मंडळींनी आपल्या कैदेच्या अनुभवतात जे भरीव व्यक्तिमत्व संपादन केले, त्याचा नवा अर्थपूर्ण आदर्श लेखिका श्रीच्या निवेदनातून अधिक गहिरा करते. तो आदर्श श्रीचा अनुभव असतो व अनूची ती अनूभूती असते. या साऱ्या मागे 'सेवा दल हा माझा प्राण आहे' असा साने गुरूजींचा ओढा व ओघ असतो. लेखिकेने उन्हाळे, पावसाळे व हिवाळे हे तिन्ही ऋतू आपलेसे करताना अवंडबर किंवा फुशरकी न दाखविता उघडया डोळयांनी पाहिले. आपल्या अध्यापनातले शाळेतील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी वातावरण चित्रीत करताना लेखिका आपल्या या कार्याशी एकरूप होते व ध्येयवादी जीवन पुन्हा पुन्हा संस्कारित करते. हे सारे प्रसंग मुळात वाचण्यासारखे लक्षणीय झाले आहेत. ते कोरडे नसून त्यात जिवंतपणा मुळातला आला आहे. इथे लेखिकेची शैली साधी, सोपी व हृदयस्पर्शी झालेली दिसेल.
 या समग्र कहाणीत जी विविध अशी निसर्ग वर्णने आली आहेत ती पात्र, प्रसंग, घटना यांना प्रेरित करणारी आहेत. ती आपल्या घटकांचे सौंदर्य खुलवितात. त्यातली अंतःकरणे उजळून देतात. या निसर्ग वर्णनाने आपण कुठे सुरूवात करायची व कुठे थांबायचे याचे कलात्मक भान वाचकापुढे ठेवले आहे. या निसर्ग वर्णनाला काव्यात्म शैलीची जोड मिळाल्याने या समग्र निवेदनाला कलेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यात वाचक विरंगुळा घेतो व लेखिकेबरोबर वाचकांनाही पुनः प्रत्ययाचा आनंद देवून जातो. बीड जिल्हयातीला परळी-अंबाजोगाई परिसर हा ध्येयधुंदीने चित्रीत करण्यापेक्षा तो आपल्या निसर्गवेडया लयीत दाखविल्याने त्याचे बाहयरंग व अंतरंग वाचकासाठी आगळे वेगळे झाले आहे. त्यातली ओघवती लहान मोठी पाने आपलेपणाने तुमच्या आमच्या जीवाचे मैत्र सांभाळून जातात.