पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शैला लोहिया यांचे हे सारे लेखन केवळ कुठल्याच वाङमय प्रसाराच्या आहारी न जाता, या शब्दमोहापलीकडे जावून ते जेव्हा सरळ साध्या सोप्या भाषेत अवतरते तेव्हा ते अधिक परिणामकारक होते. ते वाचकाच्या जाणिवेच्या क्षेत्रात पुरेसे अस्वस्थ करते. एका ध्येयवेड्या रसील्या पण प्रगल्भ जीवननिष्ठा व कलात्म व्यक्तिमत्वाचा परिचय त्यातून घडतो. लेखिका सौंदर्यलक्षी आहे. पण जीवनापासून पलायनवादी नाही. तिने प्रेम शृंगाराच्या गहिऱ्या छटा आणि निसर्गसौंदर्याच्या रंग छटा भरताना, दुसरीकडे सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये उदात्त भावाने विनासंकोच व्यक्त केले आहेत. लेखिकेचे हे सारे अनुभव प्रामाणिक असल्याने तिचे कवि मन जागरूक आहे. या 'अकराव्या दिशेचा' शोध पुढील प्रमाणे देता येईल

"माझा मार्ग दुसरा आहे
चंद्र किरणांच्या लक्ष्मण झुल्यावर भोवळ आल्याशिवाय
कशी सापडणार आकाशगंगा
तुम्हाला माहित आहे ना?
को हच्या हाकेला सो हचा प्रतिसाद मिळतो
ते अनादि देठांचे ओंकार-कमळ मी शोधीत आहे
किरणातून येणाऱ्या त्याच्या परागांना वाट द्या, अरे त्यांना वाट द्या,
तीच अकराव्या दिशेची धूळ आहे." (वसंत बापट)

प्रा. मधु जामकर
'दिलासा', स्नेहनगर,
परळी वैजनाथ, जि. बीड