पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थाटात बेबंद जुलूम आणि अत्याचार करणे त्यांना सोपे राहिले नाही. शिवाजीराजांनी जागवलेल्या महाराष्ट्र धर्माचे खरे स्वरूप हे असे.

 पण या महाराष्ट्र धर्माची ज्योत राजानंतर फार काळ तेवत राहिली नाही. औरंगजेबाच्या स्वारीस तोंड देण्यासाठी शिवाजीराजांनी घालून दिलेल्या अनेक शिस्ती आपद्धर्म म्हणून का होईना सोडून द्याव्या लागल्या. मराठा राज्यात पुन्हा वतनदार निर्माण झाले. सरदार आपापल्या प्रदेशात सत्ता गाजवू लागले. पेशवाईच्या काळापर्यंत महाराष्ट्राची स्थिती पुन्हा एकदा रामदेवरायाच्या काळापेक्षा काही मूलत: वेगळी राहिली नाही. छिन्नभिन्न झालेल्या राष्ट्रावर परकिय सत्ता प्रस्थापित होणे हे क्रमप्राप्तच आहे. रामदेवरायाचा धडा शिकला गेला नाही. म्हणून पुन्हा एकदा परकियांनी देशावर सत्ता बसविली. रामदेवरायच्या काळी आलाउद्दीन उत्तरेतून आला. पेशव्यांच्या काळी इंग्रज सातासमुद्रापलीकडून आला.

 इंग्रजांनी आपला अंमल बसवण्याच्या सुमारास देशांत लढाया, लुटालुटी इतकि माजली होती की इंग्रजांचे राज्य म्हणजे परमेश्वरी देणे आहे अशीच सर्वसामान्य लोकांची समजूत झाली. देशातील सरंजामशाही व्सवस्था या ना त्या मार्गे फोडून काढण्याचा प्रयत्न इंग्रजानीही केला; परंतु १८५७ च्या बंडानंतर इंग्रजांनी धास्ती खाऊन सर्वसामान्य प्रजाजनांना सुखावह होणारी राज्यव्यवस्था तयार करण्याऐवजी धर्मव्यवस्थेत व सामाजिक रचनेत ढवळाढवळ न करण्याचे व्रत घेतलेली व्यवस्था तयार केली. संस्थानिक बनलेले जुने राजे महाराजे, त्यांच्या दरबारी पोसलेले मंत्रीगण, कारकून आणि इतर पांढरपेशे यांनी नवीन अमलात नवीन व्यवस्थेप्रमाणे स्वत:चा उत्कर्ष साधण्याचा खटाटोप चालू केला. इंग्रज येण्यापूर्वी ही दरबारी मंडळी ज्या रयतेला लुटत होती त्या रयतेच्या परिस्थितीत मात्र काहीच बदल झाला नाही. सरदार दरकदार गेले त्या ऐवजी मामलेदार, तलाठी आले. एवढाच काय तो फरक. इंग्रज येण्यापूर्वी दररोजच्या व्यवहारात लिखापढीला फारसे महत्त्व नव्हते. आता कागदोपत्री जे लिहिले असेल तेच सत्य आणि त्याप्रमाणेच न्याय होणार अशी व्यवस्था. लेखणीची मक्तेदारी जुन्या सरदार, पुरोहित, मनसबदारांच्या वंशजाकडे आली. इंग्रजी व्यवस्थित लेखणी ही पूर्वकालीन तलवारीपेक्षाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक भयानक हत्यार ठरले.

 फिरुन एकदा स्वातंत्र्याचा प्रश्न सुरू झाला. त्यात रयतेला असे काही स्थान नव्हते, इंग्रजी अमलात संपत्ती, विद्या आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या समाजास देशातील साधन सामग्रीचा लाभ घेण्याची आकांक्षा होती. इंग्रज लूट करीत असताना त्यांच्या हातातोंडातून सांडलेल्या उष्ट्यामाष्ट्यावर त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ८२