स्वातंत्र्याच्या लढाईची बांधणी शहाजीराजांच्या स्वराज्य संस्थापनेसारखी होती. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या भाग्याशाली असलेल्या समाजाने स्वातंत्र्याचे आंदोलन आपल्या हातात घेतले आणि त्यामुळे इंग्रज निघून गेल्यावर सर्व देशाची राजकीय व आर्थिक सत्ता याच समाजाच्या हाती आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चाळीस वर्षांत आपण फिरून एकदा रामदेवरायाच्या किंवा सुलतानीच्या अवस्थेत जाऊन पोचलो आहोत. दिल्लीच्या पातहाला पंतप्रधान म्हणतात. राज्याराज्यातील त्यांच्या सुभेदारांना मुख्यमंत्री म्हणतात. जिल्ह्याजिल्ह्यात त्यांचे आमदार, अध्यक्ष, सभापती, संचालक आपापली सत्ता गाजवत आहेत. या सगळ्यांच्या राजकारणाचे सूत्र एकच. दरबारातील मंडळीस आणि जवळपासच्या कील्लेदारास खुश ठेवायचे म्हणजे सार्वभौम राजाप्रमाणे रयतेवर लुटीचा हात मारता येतो. गावपातळीच्या नेतृत्वाचे कसब हे तालुक्यातील सत्ताधाऱ्यांशी बांधिलकि ठेवणे, त्यात बदल होऊ लागला तर जी बाजू जिंकेल त्या बाजूस राहणे, या हिशेबात चूक झाली तर चपळाईने बाजू बदलून घेणे हे ज्याला जमत नाही तो आयुष्यातून उठू शकतो.
तालुक्याचे राजकारण म्हणजे जिल्ह्याच्या पुढाऱ्यांविषयी अटकळ बांधणे, जिल्ह्याचे राजकारण म्हणजे मुख्यमंत्र्याचा अंदाज बरोबर घेणे आणि राज्य पातळीवर यशस्वी होणे म्हणजे दिल्लीत कुणाची सत्ता चालेल याचे वेध अचूकपणे घेणे. वरच्या लाथा झेलायची तयारी ठेवली की खाली लाथा मारण्याची आपोआपच मुभा मिळते. अशा व्यवस्थेत दिल्लीच्या पातशहाचा होरा बरोबरा मांडणारा पुढारीसुद्धा सहज प्रतिछत्रपती म्हणून निवडून जातो.
फिरून एकदा रयतेची स्थिती केविलवाणी झाली आहे. लुटारूंच्या फौजा त्यांच्यावर चालून येत नाहीत, त्यांची चिजवस्तू हत्याराच्या बळाने लुटून नेत नाहीत, बायकांची अब्रू डोळ्यादेखत घेत नाहीत आणि सरसहा कत्तल करत नाहीत हे खरे! पण आधुनिक युगातील दीड दांडीचा तराजू हा मध्ययुगातील तलवारीपेक्षा जास्त प्रभावीपणे लुटीचे साधन बनतो. शेतकऱ्यांची लूट होतेच आहे. ते कर्जबाजारी बनतच आहेत. दैन्याने जगतच आहेत. चेअरमन, आमदार लोकांच्या समोर गावागावात पोरीबाळींची अब्रूही काही सुरक्षित नाही. थोडक्यात १८८३ साली हिंदुस्थानात 'एकमय लोक' या अर्थाने राष्ट्र अस्तित्वात नाही असा टाहो जोतिबा फुल्यांनी फोडला होता. ते 'एकमय लोकराष्ट्र' अजूनही तयार झाले नाही.
रामदेवरायाच्या आधी लुटारू देशी होते नंतर ते यावनी झाले. मग ब्राह्मणी झाले त्यानंतर फिरंगी झाले. विलायती टोपीवाले गेले आणि खादीटोपीवाले आले. राज्यकर्त्यांचे चोरांची टोळी हे स्वरूप मात्र कायमच राहिले.