पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणून सामील झाले होते. इतका या संघटनेच्या विचारांचा अभ्यास आणि प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्हावा असे वाटू लागले.
 फेब्रुवारी १९८२ मध्ये श्री. शरद जोशी यांनी रायगड जिल्ह्याच्या पेण आणि अलिबाग तालुक्याचा दौरा केला त्यावेळी त्यांनी त्यांच्या अंबाजोगाईच्या कार्यकर्ताप्रशिक्षण- शिबिराच्या ध्वनिमुद्रित कॅसेट्स नकलून काढण्यासाठी माझ्याजवळ दिल्या. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले आहे.
 अंबाजोगाई (बीड) येथे २६ आणि २७ फेब्रुवारी १९८१ असे दोन दिवस मोरेवाडीचे श्री. श्रीरंग मोरे यांच्या साहाय्याने श्री. शरद जोशी यांनी घेतलेल्या या शिबिरास पन्नासेक प्रशिक्षणार्थी कार्यकर्ते हजर होते. ते सर्वच ग्रामीण भागातून आलेले आणि मुख्यतः कोरडवाहू शेतकऱ्यांपैकी असल्यामुळे त्यांच्यात बरेचजण अल्पशिक्षित होते. त्यामुळे या शिबिरात शेतकरी संघटनेच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची जी चर्चा झाली ती अगदी सोप्या भाषेत आणि सुटसुटीतपणे झाली. या सर्व चर्चेचे शब्दांकित स्वरूप म्हणजेच हे पुस्तक आहे. अर्थात् ही चर्चा केवळ दीड दोन दिवसांतच झाल्यामुळे पुस्तकाला काही मर्यादा आहेत. या पुस्तकाची हस्तलिखित प्रत श्री. शरद जोशींकडून तपासून घेत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवून गेली.
 तरीही जाहीर सभांतून श्री. शरद जोशी किंवा अन्य नेत्यांची भाषणे ऐकून शेतकरी संघटनेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळालेल्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त मार्गदर्शन करू शकेल अशी खात्री वाटते. आतापर्यंत शेतकरी संघटनेच्या विचारसरणीबद्दल आणि कार्याबद्दल अनेक नियतकालिकांतून लिहून आलेले आहे पण त्याचा सलगपणे अभ्यास करता येईलच असे नाही. काही ठिकाणीतर संघटनेच्या अतिशयोक्त विपर्यस्त मजकूरही छापून आलेला आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक संघटनेचे तत्त्वज्ञान अधिक सलग आणि व्यापक स्वरूपात देणारे ठरेल. अर्थात हे पुस्तक १९८१ च्या फेब्रुवारी महिन्यातील शिबिरावर आधारलेले असल्यामुळे यातील उत्पादनखर्च, बाजारभाव वगैरेची आकडेवारी आणि संदर्भ १९८० मधील आहे हे लक्षात घ्यावयास हवे.

 शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतून या पुस्तकाचे सामुदायिक वाचन जरी केले तरी शेतकरी संघटनेचे प्रचारकार्य जोमाने पुढे जाईल आणि म्हणूनच या पुस्तकाची किंमत ना नफा ना तोटा या विचाराने अगदी कमी ठेवली

नऊ
शेतकरी संघटन कार्यपद्धती ।९