पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सप्रेम नमस्कार.... विनंती विशेष,

 नोव्हेंबर १९८० मध्ये उसाचं आंदोलन नासिक भागात सुरू होऊन मुंबई - आग्रा हमरस्ता अक्षरशः रोखला गेला तेव्हाच प्रथमतः बड्या वर्तमानपत्रांतून त्याअगोदर दोन वर्षे शेतकऱ्यांत सुरू झालेल्या जागृतीसंबंधी वाचावयास मिळू लागले. त्याचबरोबर शरद जोशी हे नाव वाचावयास मिळू लागले. शेतकऱ्यांत नव्याने मूळ धरू लागलेली आणि प्रथमच आर्थिक पायावर उभी असलेली शेतकरी चळवळ कशी चालली आहे हे पाहावे या कुतुहलापोटी माझे एक जेष्ठ मित्र प्रा. डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांच्या प्रेरणेने आणि सोबतीने मी नासिक भागात एक फेरफटका मारला. तेव्हा सर्व नेते मंडळी अटकेत असल्यामुळे शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानाशी फारसा परिचय झाला नाही; परंतु इतकी दडपशाही होऊनही अजूनही तुरुंगाबाहेर असलेले अडाणी (?) शेतकरी रस्त्यावर येत होते, त्यानंतर बायकामुलेही घरच्या गुराढोरांसह रस्त्यावर येण्याचा निर्धार करून बसले होते. हे पाहून संघटनेने दिलेला विचार तितकाच मौलिक असला पाहिजे याची खात्री पटली आणि संघटनेबद्दल एक आकर्षण निर्माण झाले.
 पुढे मार्च १९८१ मध्ये निपाणी येथे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना डॉ. कुळकर्णीबरोबर जाण्याची संधी मिळाली आणि तेथे शेतकरी नेते श्री. शरद जोशी यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि मग हा परिचय वाढतच राहिला.
 २० सप्टेंबर १९८१ रोजी म्हणजे नासिक विभागातील ऊस-आंदोलन संपल्यानंतर जवळ जवळ वर्षभराने पिंपळगाव-बसवंत येथे शेतकऱ्यांचा एक मेळावा झाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचार केवळ वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन केला होता. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत श्री. माधवराव मोऱ्यांसारखा निधडा माणूसही किती शेतकरी जमा होतील याबद्दल साशंक होता. पण दुपारी बारानंतरच्या रणरणत्या उन्हात तेथे सतत येत राहिलेला शेतकऱ्यांचा लोंढा आणि त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

 जानेवारी १९८२ च्या १।२।३ तारखांना सटाणा येथे शेतकरी संघनेचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनात पंधरा रुपये प्रतिनिधित्व शुल्क भरून साऱ्या महाराष्ट्रातून तीस हजार शेतकरी स्वखर्चाने आणि आपली आपली शिदोरी बांधून

आठ