पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक एकर जमीन घेऊन त्यावर ४० गाई ठेवतो. त्यात प्रत्येक गाईवर सरासरी खर्च किती आणि गाईचं सरासरी दूध किती याचा विचार केला आहे. गाईचा खर्च काढताना एका वर्षात गाईचं माजावर येणं किती वेळा, वेत किती दिवसांनी, किती काळ गाय भाकड राहते यांचाही विचार केला आहे. ज्याची एकच गाय आहे त्याच्या बाबतीत असे हिशेब काढणे कठीण आहे. पण ४० गाई असल्या म्हणजे हे हिशेब करणे सोपे जाते. सगळ्याच्या सगळ्या ४० गाई संकरित जातीच्या. तिसऱ्या महिन्याला माजावर येणाऱ्या असल्या तरी प्रत्यक्ष तीसच वेळेवर माजावर येतात, काही भाकडच राहातात. एक एकर जागेत या गाई ठेवल्या, म्हणजे टाळता येणार नाही असा एक खर्च येतो तो म्हणजे त्या सबंध जागेला तारेचं किंवा कसलं तरी कुंपण घालावं लागणार. एक एकर जागेत या गाई ठेवल्या, म्हणजे टाळता येणार नाही असा एक खर्च येतो तो म्हणजे त्या सबंध जागेला तारेचं किंवा कसलं तरी कुंपण घालावं लागणार. एक एकर जमिनीला तारेचं कुंपण घालायचं म्हणजे सुरुवातीलाच ४०/५० हजारांचा भांडवली खर्च आला. हा खर्च जर सुरुवातीलाच हिशेबात धरला तर दूध कुणालाच परवडणार नाही. यावर आम्ही उपाय काढला. हा सर्वाच्या सर्व खर्च सुरुवातीला करणं शक्य नाही. एकाचं संपूर्ण कुंपण घातलं असं न करता ते टप्याटप्याने घालणार असं गृहीत धरलं. गाईमागे दर वर्षाला रु. १०० विकास खर्च धरला. कुंपणाबरोबरच पावसाळ्यात शेतापर्यंत ट्रक यावा म्हणून पक्का रस्ता. गोबर गॅस प्लान्ट, दुग्धव्यवसायासाठी टेलिफोन या सोयी या विकास खर्चातून टप्याटप्याने करता येतील. कारखान्यात जसा विकासनिधी असतो तसा हा विकासनिधी धरा आणि हळूहळू सुधारणा करून घ्या. अशा तऱ्हेने सुरुवातीचा अटळ असा भरमसाट खर्च मोठ्या काळामध्ये विभागून दुधाच्या भावाची पातळी रु. ३.८० पर्यंत खाली ठेवली आहे.
 खरं तर आपण जे मागतो तेसुद्धा पुरे नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण आपण जे मागतो आहोत ते आज मिळतं त्यापेक्षा इतकं जास्त आहे की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. आम्ही जेव्हा उसाला टनाला रु. ३०० चा भाव मागितला तेव्हा 'हे काहीतरी भलतंच आहे' असं लोक म्हणाले. आपण दुधाला रु. ३.८० दर लिटरला मिळाले पाहिजेत असं जाहीर केलं तर हाहाकार उडेल. पण मागणी करताना आपण डावपेचात काय मिळणार आहोत हेसुद्धा पाहायला हवे. तुमची इच्छा आहे शिखरावर जाण्याची. पण आज जे आपण