वर्षे टिकत असेल तर त्याचा खर्च विभागून १० वर्षांच्या पिकांच्या खर्चात विभागून धरायचा. म्हणजे एका वर्षाच्या पिकावर गोठ्याच्या एकूण खर्चाचा एक दशांश धरायला पाहिजे. लोखंडी नांगर ६ वर्षे टिकतो. त्याचा खर्च ६ वर्षांच्या पिकावर टाकला पाहिजे. बैलसुद्धा त्याच पद्धतीने जितकी वर्षे काम करू शकेल तितक्या वर्षांच्या पिकांवर त्याची किंमत विभागली पाहिजे. अर्थात् बैलांवरील खाणे, देखरेख इत्यादींवरील दैनंदिन खर्च त्या त्या वर्षाच्या पिकांवर धरला पाहिजे. समजा विहीर खोदण्यासाठी, बांधण्यासाठी ५० हजार रु. खर्च आला असेल आणि विहीर २०/ २५ वर्षे टिकते तर तिचा खर्च तितक्या वर्षांच्या पिकांवर धरला पाहिजे. त्याशिवाय अडकलेल्या भांडवलावर व्याजही आकारले पाहिजे.
नंतर मजुरी. शेतीकामासाठी आपल्याला रोजगारावर माणसे घ्यावी लागतात. त्यांची मजुरी या खर्चात धरली पाहिजे. पण रोजगारावरील माणसांबरोबर किंवा ती नसतानासुद्धा आपल्या घरची माणसे शेतीची कामं करत असतात. त्यांचीही मजुरी खर्चात धरली पाहिजे? ती कोणत्या पद्धतीनं धरली पाहिजे? आपल्या घरच्या माणसांसाठी रोज दोन वेळचे जेवण आणि वर्षासाठी कपड्याचे दोन जोड एवढीच जबाबदारी नसते. त्यांच्या आजारपणात औषधपाण्याचा खर्च असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो. मुलीच्या लग्नकार्याचा खर्च असतो. दशपिंडाचा खर्च असतो. हे आणि असे सर्व खर्च घरच्या माणसांच्या मजुरीत धरले पाहिजेत. हे धरले नाहीत तर शेती फायद्याची दिसेल पण मुलीच्या लग्नासाठी जमीन गहाण टाकून कर्ज काढावं लागेल; शेती किफायतशीर वाटेल तरी दशपिंडांसाठी कर्ज काढावं लागेल. जमीन गहाण टाकून. घरच्या माणसांच्या मजुरीचा विचार करताना आपल्या दर्जाला, परंपरेला योग्य असा खर्च लक्षात घेतला पाहिजे. नाही तर किमान बाहेरच्या माणसाला आपण जी मजुरी देतो तितकी तरी मजुरी धरली पाहिजे. आजपर्यंत आम्ही संघटनेतर्फे जे हिशोब केले त्या बाहेरची माणसं ज्या दरानं काम करतात त्याच दरानं घरची माणसं काम करतात असं धरलं आहे. म्हणजे आपली माणसं दुसऱ्याच्या शेतात काम करतात आणि शेजारची माणसं आपल्याकडे काम करतात आणि आपण त्यांना रोख मजुरी देतो असं धरलं आहे. आपली शेती चार पाच महिनेच असते. इतर वेळी पाण्याअभावी पडून असते. घरच्या माणसांना मात्र आपल्याला बाराही महिने जेवू घालायचे (जगवायचे) असते. तरी खर्च काढताना प्रत्यक्ष जितके तास काम होतं तितक्या तासांचीच