पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मजुरी धरली जाते. जास्त नाही. हे मुद्दाम सांगण्याचे कारण, पुढे अभ्यास करताना उत्पादन खर्चाचा आकडा येनकेनप्रकारेण मोठा काढला अशी शंका येण्याची शक्यता आहे. आपण प्रत्यक्ष केलेल्या कामाचीच मजुरी धरतो.
 उत्पादन खर्चातील इतर मुद्दे जे आहेत ते समजायला सोपे आहेत. आपण शेतात जी खते घालतो-रासायनिक खते, शेणखत, बकऱ्या बसविणे, कुणी मग मोडत असतील तर ते - यांचा खर्च घेतला पाहिजे. बी-बियाण्यांची किंमत-जरी घरचं बियाणं वापरलं असलं तरी त्याची किंमत खर्चात धरायला हवी, त्यानंतर औषधे वापरावी लागतात. त्यांची किंमत आणि फवारणी वगैरेची मजुरी एकूण खर्चात धरली पाहिजे.

 शेतात मजुरी काय द्यावी लागते या विषयी आपण सविस्तर बोलू शकतो. पण शेतासाठी फक्त मजूरच लागतात का? कारखान्यात नुसते कामगार नसतात. सुपरवायझर असतो, मॅनेजर असतो. तसं शेतीमध्ये काय असतं काय? आमच्या चाकण भागामध्ये साधारणपणे ज्या घरात ५ एकरापर्यंत जमीन असते तिथं घरातला एक मनुष्य-ज्याला कारभारी म्हणतात, सतत शेतीच्या बाहेरच्या कामासाठी फिरत असतो. कधी तरी ८/१० दिवसांनी शेतावर जातो. त्याची काम कोणती असतात? यंदा पीक कोणचं घ्यायचं ते ठरवणं, चांगल्या दर्जाची बी-बियाणं मिळवणं, मजूर मिळत नसतील तर मिळवून आणणं, बाजारात मालाच्या विक्रीची व्यवस्था करणं, व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हेलपाटे घालणं, लागतील तेव्हा तलाठ्याकडून ७-१२ चे उतारे आणणं, गाव नमुना ८-अ चे उतारे आणणं, कर्जासाठी सोसायटीकडे जाणं, बँकांकडे जाणं, कोर्टात काही दावा असेल तर तारखेला कोर्टात जाऊन बसणं आणि पुढची तारीख घेऊन परत येणं आणि इतकं सर्व करून कर्ज फेडता येणार नसेल तर या माणसाला भेट, त्या आमदाराला भेट, त्या चेअरमनला भेट आणि 'आपल्या घरची जप्ती टाळ बाबा' म्हणून पाय धर या सगळ्या गोष्टींसाठी घरचा एक माणूस कायमचा अडकलेला असतो. याचा खर्च कसा धरायचा? शेती व्यवसायाला व्यवस्थापन आहे किंवा नाही? यावर काही मंडळी हरकत घेतात. ते उपहासाने म्हणतात, 'हा कारभारी बाजारच्या ठिकाणी जातो आणि चहा मिसळ खातो किंवा चहा भजी खातो. त्याचा कसला खर्च धरायचा? हा उनाड मनुष्य आहे.' कारखान्याच्या बाबतीत सेल्स मॅनेजर असतो; विक्री करणारा मनुष्य असतो. किर्लोस्करची इंजिनं विकणारी हजारो माणसं गावोगाव हिंडतात. चांगल्या चांगल्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २९