काही वस्तू दर हंगामात घ्याव्या लागतात, काही वर्षभर टिकतात, काही जास्त टिकतात. प्रत्येक पिकाला या वस्तूंचा ज्या प्रमाणात उपयोग होईल त्या प्रमाणात त्या वस्तूंची किंमत खर्चाच्या यादीत घ्यावयास हवी.
या वस्तूंची नुसती किंमत धरून भागणार नाही. या वस्तूंच्या रूपाने रोख रक्कम अडून राहते. त्यावरील व्याज बुडते. तोसुद्धा एक खर्चच आहे.
औत अवजारांना दुरुस्ती करावी लागते. हा खर्च विसरून चालणार नाही. कृषिमूल्य आयोगाने दुरुस्तीखर्च गेली १५ वर्षे लक्षात घेतला नाही.
बैलांची गरज आहे. त्यासाठी गोठ्याची गरज आहे. उन्हाळ्यात मांडव. करायला पाहिजे.
जमिनीची प्रत टिकावी, निदान धुपणी होऊ नये यासाठी दरवर्षी बांधबंदिस्ती, चर, पाट यांची डगडुजी करणे, पेटारणे, जमिनीची तपासणी करून घेणे हे काही फुकट होत नाही.
आणि सगळ्यात मोठा खर्च म्हणजे शेतजमीनच. वर्षानुवर्षे घाम गाळून कमावलेली जमीन, केलेली बांधबंदिस्ती, खोदलेल्या वहिरी ही प्रचंड गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीवरील व्याज आणि घसारा धरला पाहिजे. आपली जमीन वाडवडिलांकडून मिळाली, मग तिचा खर्च काय धरायचा असे म्हणू नका. जमीन वाडवडिलांकडून उसनी घेतली आहे असे समजून त्यांना ती निदान आपल्या हाती आली तेव्हा होती इतक्या तरी चांगल्या अवस्थेत पोचवायला हवी.
हे वेगवेगळे खर्च प्रत्यक्षात कसे काढावे याचा थोडा तपशिलात विचार करूया.
आपण जी जमीन वापरतो त्या जमिनीचं शेतजमीन म्हणून स्वरूप कायम राहण्याकरिता आपल्याला जे खर्च करावे लागतात त्या पोटी त्या जमिनीच्या आजच्या किमतीच्या १० % रक्कम खर्च म्हणून धरली पाहिजे. जमीन आज विकली तर तिची जी किंमत येईल ती बँकेत मुदतीच्या ठेवीने ठेवली तर काही कष्ट न करता, अगदी इकडची काडी तिकडे न करता १० % व्याज खाता येईल. शेती करायची ठरवली की शेतकरी ही रक्कम गमावतो. हा खर्चाचा पहिला घटक.
शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे बैल, गोठा, औतं-औजारं, विहीर इत्यादींवरील खर्च धरावयास पाहिजे. हा सर्व भांडवली खर्च आहे. त्यामुळे तो एकाच वर्षाच्या पिकावर टाकायचा नाही. समजा बैलासाठी बांधलेला गोठा १०