पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण : ३
 शेतीमालाचा उत्पादन खर्च


 उत्पादन खर्च म्हणजे काय? त्याचा हिशेब कसा करायचा? त्याचा उपयोग काय? या विषयांचा अभ्यास हे वेगळे शास्त्र आहे. याचा अभ्यास महाविद्यालयात फार वरच्या वर्गात केला जातो.
 आपल्याला सर्वसाधारणपणे घ्यावयाचा आहे. कोणतेही एक पीक घेण्यासाठी काय काय लागते? त्या सगळ्यांची एक यादी बनवा.
 तुमच्या यादीत बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके इत्यादी औषधे, पेट्रोल, डिझेल, वीज लिहावयास तुम्ही विसरला नसाल. जमिनीचं मशागत (नांगरट, पाळी), पेरणी, सऱ्या किंवा वाफे करणे, पाभार व फराट चालवणे, बी टिपणे किंवा फुंकणे, कोळपणी (माणसांची वा जनावरांची),खुरपणी माती सावरणे, सऱ्या सावरणे, खते देणे, औषधे फवारणे, पिके काढणी (तोड), बांधणी, झोडपणी, उफणणी, गंजी लावणे, पोती भरणे, बाजारासाठी माल तयार करणे, साठवण, वाळवणे, जनावरांची देखभाल इत्यादी कामांची लागणारी मजुरीही धरायला तुम्ही विसरला नसाल. पण ही कामे घरातली माणसं करीत असली तर तुम्ही खर्चाच्या यादीत त्यांचे श्रम धरले नसतील. श्रम रोजावरील मजुरांनी केलेले असोत वा घरच्यांनी केलेले असोत त्याचा खर्च धरावयास पाहिजे.

 शेतीला लागणारी खते, वरखते, औषधे, अवजारे लांब अंतरावरून आणावी लागतात. या वाहतुकीस खर्च येतो. माल बाजारात नेण्यासाठी खर्च येतो. या वाहतुकीचा खर्च तुमच्या यादीत आहे का? असला तर तुम्ही कृषिमूल्य आयोगाच्या विद्वान सदस्यांपेक्षा बुद्धिमान आहात; कारण गेली १५ वर्षे हा खर्च लक्षात घेण्याचे हे विद्वान विसरूनच गेले होते. बियाणे, खते, औषधे असली म्हणजे शेती होते असे नाही. याखेरीज काही भांडवली खर्च असे असतात की, जे एकापेक्षा जास्त पिकांच्या उपयोगी पडतात. शेती करायला अनेक हत्यारे, अवजारे, औते यांची गरज आहे. ट्रॅक्टर, नांगर (लोखंडी वा लाकडी), नांगऱ्या, कुळव, पेटारा, मोघड, पाभार, फरट, जोळ, कुळपी अशी औते अवजारे, तसेच टिकाव, खोरी, पहार, घर, हातोडी, विळे, खुरपी, पाट्या, घमेली, दोर चप्टारे, मुसक्या इत्यादी साधने लागतात. पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोट, इंजिन, मोटर, पंप स्टार्टर, पाईप यांची गरज आहे.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २६