पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्यक्ष दररोजच्या आयुष्यातील अनुभव काय आहे त्या अनुभवावरूनच आपण शहाणपणा शिकायचा आहे. शंकराचार्यांनी जसं म्हटलं आहे, अग्नी-निखारा थंड आहे असे हजार वेदांनी जरी सांगितले तरी ते मी मानणार नाही, तसं सरकारी रिपोर्टात जरी सांगितलं शेतकऱ्यांची परिस्थिती आता चांगली आहे, शेतकरी सुखी आहे तरी ते मी मानायला तयार होणार नाही. गंमत कशी असते बघा. दिल्लीला शेतकऱ्यांचा एक मेळावा झाल्यानंतर पंतप्रधानांनी एक भाषण दिले-मेळाव्यानंतर. त्यात त्या म्हणाल्या, 'हे जे बोलणं चाललं आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे हे मला मान्य नाही. मी जेव्हा जेव्हा गावागावात जाते, तिथं माझ्या असं लक्षात येतं की आता शेतकऱ्याची परिस्थिती सुधारू लागली आहे.' जी मंडळी खुर्चीवर/सत्तेवर बसतात ती म्हणतात, 'तुम्हाला वाटते इतकी काय वाईट परिस्थिती नाही. शेतकऱ्याचं सध्या बर चाललं आहे.' पुढं ही मंडळी खुर्चीवरून उतरली की म्हणू लागतात. 'प्रश्न फार भयानक आहे.' तेव्हा या मंडळींच्या चर्चेच्या जंगलात आपण सापडू नये. आपल्याला प्रत्यक्ष काय अनुभवायला येतं त्याच्या आधारावर आपण आपले विचार तयार करू.
 आणि आज कुणी आहे का ३० वर्षापूर्वी आमच्या घरात जी परिस्थिती होती त्यांच्यापेक्षा चांगली आहे असं म्हणणारा? म्हणणारे भेटतील, पण कोण? तर ते ज्यांनी शेतीच्या पलीकडे काही धंदा व्यवसाय केला आहे. ज्यांनी निदान राजकारण केलं पंचायत समितीत गेले, जि.प.त गेले, आमदार-खासदार बनले असे लोक तसं म्हणणारे भेटतील. किंवा कुणी काही खटपटी करून पेट्रोलपंप, टेंपो, ट्रक मिळविले असे म्हणतील. पण ज्यांनी केवळ शेती केली त्यांच्या घरची परिस्थिती सुधारली असं एकतरी उदाहरण इथ आहे का? असेल तर सांगा. आपण त्याचा अभ्यास करू. ३३ वर्षात सोसायटी पूर्णपणे फेडली आणि मेला किंवा कर्जफेड करून कर्जमुक्त झाला असं एकतरी उदाहरण आपल्याला सापडेल काय?
 कोणत्याही अर्थानं घेतलं तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचं दारिद्र्य सतत वाढतं आहे. या दारिद्र्याविषयी आपण दोन प्रमुख गोष्टी पाहिल्या. (१) या दारिद्र्याच मूळ कोरडवाहू शेतीमध्ये आहे आणि (२) शहरी भागातील दारिद्र्य हे ग्रामीण भागातील दारिद्र्याचा परिणाम आहे.

 ताटातील अन्नपदार्थांचे उदाहरण किंवा सोसायट्यांच्या कर्जाचे उदाहरण या बरोबर आपण आणखी एक उदाहरण पाहू. ज्या गावात सर्व व्यवहार फक्त शेती

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २४