पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या देशात दारिद्र्य आहे. ते हटवायचे आहे, दूर करावयाचे आहे. 'गरिबी हटाव' च्या घोषणा आपण गेली कित्येक वर्षे ऐकत आहोत. प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. ही गरिबी आहे कुठे? गरिबी हटवायची आहे ना? मग तिचा शोध घेतला पाहिजे. गरिबी शहरात आहे का? शहरात झोपडपट्ट्या आहेत. तिथे बेकार आहेत, भिकारी आहेत, गलिच्छ वस्त्यांत राहणारे आहेत. तेव्हा शहरातही दारिद्र्य आहे. खेडेगावातील दारिद्र्य आपण कोरडवाहू भागात बघतोच आहोत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकरी चाकण भागात भुईमुगाचा हंगाम सुरू झाला की गाढवावर गाडगी मडकी लादून जातात-पोट भरवण्यासाठी. कोरडवाहू शेतीतील दारिद्र्य आपल्याला सांगायला नको. पण गरिबी मुळात सुरू कुठे होते हे पाहायलाच हवे. शहरात की खेड्यात? याच उत्तर येतं - सर्व गरिबीचे / दारिद्र्याचे मूळ कोरडवाहू शेतीत आहे. शहरात गरिबी आहे. तिथं गलिच्छ वस्त्या आहेत, बेकार आहेत, भिकारी आहेत. पण या मंडळीशी जर आपण बोललात तर असं आढळून येईल की या पिढीत किंवा गेल्या पिढीत, नाही तर त्या आगोदरच्या एक दोन पिढ्यात ही सर्व मंडळी कोरडवाहू शेतीवर होती - महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, केरळ वगैरे राज्यांत. तिथं कोरडवाहू शेतीवर पोट भरता येईना म्हणून एक दिवस-बहुतांशी दुष्काळाच्या वर्षी-जी काय जमीन असेल ती येईल त्या किमतीत फुंकून टाकायची, बैलं जी जिवंत राहणार असतील ती विकून टाकायची आणि काय गाडगी मडकी असतील ती बांधून शहरात रोजगारासाठी, पोटाकरता जाऊन राहायची. शहरातील त्यांची राहण्याची अवस्था भयानक, गलिच्छ, अतिशय घाण असूनसुद्धा ते तिथंच राहणं पत्करतात कारण त्यांचं गावातलं कोरडवाहू शेतीवरचं आयुष्य त्याहूनही भयानक होतं. एखाद युद्ध झाल्यावर जर एखाद्या शहरावर बाँब पडला, आगी लागल्या असं झालं म्हणजे घरदारं नाहीत म्हणून तेथील होक उठून दुसरीकडे जाऊन निर्वासित म्हणून राहतात त्याचप्रमाणे कोरडवाहू शेतकरी म्हणून जगणं अशक्य झालं, म्हणून शहरात जाऊन राहिलेली ही निर्वासित मंडळी आहेत. म्हणून दारिद्र्याची मूळ सुरुवात कोरडवाहू शेतीत आहे. म्हणून दारिद्र्याच्या प्रश्नाचा अभ्यास करताना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की देशातील दारिद्र्याचे मूळ कोरडवाहू शेतीत आहे.

 मुंबईतील झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या लोकांचा शास्त्रीय अभ्यास अनेकांनी केला आहे. * त्यांचे निष्कर्ष पाहण्यासारखे आहेत.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २२