प्रकरण :२
शेतकरी आंदोलनाचे अंतिम उद्दिष्ट
शेतकरी आंदोलनाचा हेतू स्पष्ट आहे. केवळ शेतकऱ्यांचा फायदा करून देणे हे या आंदोलनाचे उद्दिष्ट नसून सर्व देशातील गरिबी हटवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वर्तमानपत्रांतून आपल्याला वाचायला मिळतं की कामगार पगारवाढीसाठी आंदोलन करतात, पगार चांगला असेल तर बोनससाठी, बोनस मिळत असेल तर रजा, नोकरीसाठी जास्त चांगल्या अटी यासाठी आंदोलनं करतात. महिना २५०० रु. पगाराची नोकरी असलेले पायलट यांत्रिक बिघाड,खराब वातावरण आदी कारणांसाठी कुठे अधिक वेळ थांबाव लागलं तर ओव्हर टाइम किती मिळाला पाहिजे यासाठी संप करतात. मला कसं जास्त मिळेल यासाठी जो तो संघटित होतो आणि आंदोलन करतो. शेतकरी-संघटनेचा एक कलमी कार्यक्रम-शेतमालाला रास्त किंमत ही मागणी कामगारांच्या मागणीसारखीच दिसेल. असं वाटेल की आता शेतकरी म्हणतो, 'मलासुद्धा आता जरा जास्त द्या.' इतरांप्रमाणेच आमच्या कष्टाला योग्य मोल द्या, अशी त्याची मागणी आहे. या मागील भूमिका केवळ शेतकऱ्याला जास्त मिळावे अशी नाही. मला जास्त द्या अशी मागणी एखादा छोटा गट करू शकतो. कामगारांचा गट छोटा आहे, वैमानिकांचा गट छोटा आहे, सरकारी नोकरांचा गट छोटा आहे. पण शेतकरी वर्ग देशाच्या ७० ते ७५ टक्के आहे. तो मला जास्त द्या अशी मागणी केवळ स्वार्थबुद्धीने करीत राहिला आणि त्याच्या श्रमाला योग्य मोल मिळत असतानासुद्धा जर जास्त मागू लागला तर ती मागणी व्यवहारात उतरवणे शक्यच होणार नाही आणि शक्य झाले तरी एकूण देशावर निश्चितपणे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा बहुसंख्य गट केवळ स्वार्थाचा विचार करून देशातले जे मोठे प्रश्न आहेत ते सोडविण्याकरिता ही मागणी करतो आहे. शेतीमालाला रास्त भाव मागतो आहे. तो देशातील दारिद्र्य दूर करण्याकरताच. शेतकऱ्याला फायदा व्हावा म्हणून नाही; तर देशातील दारिद्र्य दूर व्हावे या करताच शेतीमालाला रास्त भाव मागणे हा एक कलमी कार्यक्रम आहे.