पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झोपला होता. ते बरे होते. पण आता तो जागा झाल्यामुळे आज हा रस्ता बंद, उद्या तो रस्ता बंद. म्हणजे वाहतुकीत अडचणीच निर्माण होणार. या तकतकीपेक्षा ज्वारीला पन्नास पैसे जास्त दिलेले बरे. असं जेव्हा ताकदीचं वातावरण तयार होईल तेव्हाच आंदोलन यशस्वी होईल आणि आज जे आंदोलनाविषयी तुच्छतेने बोलत आहेत ते सुद्धा व्यवस्थितपणे बोलू लागतील.
 आपला विचार स्पष्टपणे मांडावा पण त्यात कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न करू नये. तशी काही माणसे आपोआप दुखावली जातात. आपण तसा प्रयत्न मुद्दाम करू नये. शेतकरी-संघटनेचे यश हे अनेक राजकारणी पुढाऱ्यांच्या आयुष्याचे अपयश आहे. 'शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती व्हावी असे म्हणत आम्ही वर्षानुवर्षे घालवली; परंतु आम्हाला ते जमलं नाही. पण एक शेतकरी-आंदोलन केवळ दहा महिन्यात उभं राहतं. सर्व शेतकरी, छोटा शेतकरी, शेतमजूर असे भेदसुद्धा विसरून एकत्र येतात,' हेच त्यांचं अपयश आहे. हेही आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना म्हणायला वाव राहिल की शेतकऱ्यांची संघटना होऊच शकणार नाही. एक पुढारी तर म्हणतात, 'एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण शेतकऱ्यांची संघटना होणं शक्य नाही.' आज संघटना उभी राहताना दिसते, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो - हे जर शक्य होत तर आपण का केलं नाही? आणि हे डाचत असल्यामुळेच संघटनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे. आज आपल्याला माणसं मिळवीत जायचं आहे. संघटना बांधत जायचं आहे. माणसं तोडायची नाहीत. तोडणं सोपं असतं. ज्यांना आंदोलन करावयाचे आहे त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की माणूस, मग तो कसाही असो आपल्याविरुद्ध असण्यापेक्षा आपल्या बाजूच्या एखाद्या कोपऱ्यात का असेना, असणे बरे.
 सारांश, प्रचार करताना या आधीच्या काळातील शेतकरी आंदोलनांच्या प्रयत्नाविषयी आदर बाळगून प्रचार करावा. १९७७ पासूनची धान्याची मुबलकता, राजकीय पक्षांविषयींचा भ्रमनिरास या गोष्टी १९८० सालचं आंदोलन प्रभावीपणे उभं राहण्यामागील प्रमुख बाबी आहेत. ग्राहकांच्या बाजूनं काळजीपूर्वक विचार मांडायला हवेत.

 ****

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । २०