पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुसरं म्हणजे राजकीय परिस्थिती ७५ सालातील आणीबाणी, ७७ सालात निवडणुका, त्यानंतर पुन्हा निवडणुका, यामुळे एक पक्ष सत्तेवरून जाऊन दुसरा येणे आणि अल्पावधीत पुन्हा पहिलाच पक्ष सत्तेवर येणे, त्याचबरोबर पुढाऱ्यांच्या पक्षोपक्षातील कोलांटउड्या यामुळे सामान्य जनतेच्या मनात सर्व राजकीय पक्षांविषयी निराशा निर्माण झाली. त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली. या पर्श्वभूमीवर '३३ वर्षे शासन शेतकऱ्यांना फसवीत आलं आहे' हा आपला विचार आपण ताठ मानेने, जोरजोराने शेतकऱ्यांपुढे मांडतो. लोक ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. ७५ साली अशी निराशा नव्हती. तेव्हा जर आपण असे बोललो असतो तर कदाचित लोकांनी ऐकून घेतलं नसतं. आज परिस्थिती बदलली आहे. अनुभवाचे चटके बरीच वर्षे खाल्यामुळे लोकांना हा विचार पटतो. म्हणूनच ८० साल शेकऱ्यांच्या नवीन युगाची सुरुवात आहे. अशा परिस्थितीत ८० साली आपल्याला शेतकरी आंदोलन करायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. या आधी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना द्यावा लागला. चटके खाऊन पराभव पत्करावा लागला आणि घोर निराशा पचवावी लागली.
 निपाणीला तंबाखू उत्पादक शेकऱ्यांची एक परिषद घेण्यात आली. तिला चौदा हजार शेतकरी जमले होते. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल अशा हालचाली झाल्या नाहीत तर १४ मार्चपासून तंबाखूच्या भावासाठी लढा देण्याचे ठरले आहे. *निपाणी शहरातील तंबाखूचा व्यापार संपूर्णपणे खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात आहे. ते शेतकऱ्यांवर जबरदस्त अन्याय करीत आहेत. निपाणी भागात १९५६ पासून तंबाखूची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तेव्हापासून शेतकरी अधिक भावाची मागणी सतत करीत आहेत; परंतु व्यापारी शेतकऱ्यांना फक्त लुटत आहेत. शेतकऱ्याने व्यापाऱ्याच्या दारी तंबाखूचा नमुना घेऊन जायचे. मग व्यापारी तंबाखूचा भाव ठरवतो. प्रथमच भाव ठरवताना व्यापारी शेतकऱ्याला मारतो. पुढे जर तंबाखूचे भाव घसरले तर व्यापारी सौदा विसरून शेतकऱ्याला सोडून देतो.


 *१४ मार्च १९८१ रोजी निपाणी परिसरातील तंबाखू उत्पादक आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या जाचातून सुटण्यासाठी आणि शेतीमालाला किंमत मिळावी या मागणीसाठी आपले आंदोलन सुरू केले. ४० हजार शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसले आणि वाहतूक बंद पडली. या महामार्गाच्या सुमारे ३ कि.मी. भागाला एखाद्या नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागाला 'आंदोलन नगरी' असेच नाव देण्यात आले. धाकदपटशा, प्रलोभन, भेदनीती या कशालाही दाद न देता सर्व शेतकरी सतत २३ दिवस शांततेने आणि वाढत्या निग्रहाने रस्त्यावर बसून होते. या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १७