पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्याला आहे त्यामुळे त्यांना हा विषय जितका कठीण वाटतो तितका आपल्याला वाटणारा नाही. पुण्यातील एक सुप्रसिद्ध प्राध्यापक एका कार्यक्रमाला होते. त्यांनी विचारले, 'महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जो विचार समजणे कठीण जाईल तो विचार खेड्यापाड्यातील अशिक्षित शेतकऱ्यांना तुम्ही कसा समजावून देता?' शेतकऱ्यांना हा विषय समजायला कठीण नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून एकदा तरी 'उलट्या पट्टी'चा अनुभव येतो. उलटी पट्टी म्हणजे दलालामार्फत भाजीपाल्यासारखा शेतीमाल बाजारात पाठविल्यावर त्याच्या किमतीची जी पट्टी शिल्लक न राहता शेतकऱ्यांच्याच अंगावर काही देणे राहते. हा अनुभव ज्याला एकदा आलेला आहे त्याला शेतमालाच्या किमतीचा प्रश्न समजावून देणं आणि त्यांनी तो समजावून घेणं कठीण राहत नाही. ज्याला आपली परिस्थिती दिवसेंदिवस ओढागस्तीची होत चाललेली आहे हे अनुभवाने माहीत आहे. त्याला हा विषय समजायला कठीण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जो विषय मांडणे जड वाटते तो सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार जलद गतीने समजावून घेतला आहे. आत्मसात केला आहे. इतका की त्यानंतर दोन दोन लाखांच्या संख्येने शेतकरी चळवळीत समील झाले, तुरुंगात जायला तयार झाले, लाठ्या खायला तयार झाले. असा या विचाराचा प्रभाव आहे.
 या विचारांचा प्रसार करताना कार्यकर्त्यांनी काही गोष्टी पाळायला हव्यात. त्यासाठी कार्यकर्त्यांना काही सूचना:
 इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलन प्रथमच उभे राहत आहे असे ठिकठिकाणी लिहिले / बोलले जात असले, तरी कार्यकर्त्यांनी या अगोदर झालेल्या शेतकरी आंदोलनाविषयी, चळवळींविषयी उपहासाने बोलू नये.
 पूर्वी लहान लहान शेतकरी आंदोलने झाली, त्यामुळे शेतकऱ्यांत हळूहळू जागृती होऊ लागली. त्या प्रत्येक आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे डोळे थोडे थोडे उघडले; परंतु त्यांतील अपयशांमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली. निराशा-जागृती-निराशा या फेऱ्यात सापडलेला शेतकरी त्याच्या पूर्वानुभवामुळेच आपण संघटित करू शकलो, त्याचे आंदोलन उभे करू शकलो.

 पूर्वीच्या शेतकरी आंदोलनांचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात जुन्यातलं जुनं आंदोलन म्हणजे तंट्या भिल्लाचं म्हणावं लागेल. त्या दृष्टीने तंट्या भिल्ल हा शेतकरी आंदोलनांचा मूळ प्रवर्तक म्हणावा लागेल. त्या काळी कुळांवरील अन्याय

शेतकरी संघट कार्यपद्धती । १४