प्रकरण :१
प्रास्ताविक
आजपर्यंत शेतकरी संघटनेचा विचार मांडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, असे वेगवेगळे कार्यक्रम झाले. पुढेही होत राहतील; परंतु हे सर्व मर्यादित वेळांचे कार्यक्रम आहेत. जाहीर सभांतून विचार मांडायला आणि ऐकायला एक किंवा दीड तास मिळतो. इतक्या थोड्या वेळात फार खोलात जाऊन विचार मांडता येत नाही. सभेस हजर राहणारा सर्वसामान्य शेतकरी असतो त्याला खोलात जाऊन तात्त्विक विचार करण्याची वा समजून घेण्याची कुवत या फुरसत नसते आणि साधारणपणे काय चाललेले आहे हे जाणून घ्यावे या औत्सुक्याने तो सभेस आलेला असतो; परंतु ज्यांना गावोगावी संघटनेच्या विचाराच्या प्रसाराचे काम करावयाचे आहे त्यांना इतका जुजबी अभ्यास पुरेसा नाही. खेड्यात कुणी वेडेवाकडे प्रश्न विचारले, डिवचून टोचून प्रश्न विचारले तरीसुद्धा त्यांची योग्य उत्तरे देता आली पाहिजेत. त्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास व्हावा म्हणून मेळावे आणि प्रशिक्षण-शिबिरांचे कार्यक्रम घेतले जातात. पण तेथेही वेळ अपुराच वाटतो. मुळातच संघटनेच्या विचारांचा अभ्यास नसल्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न आणि शंका यामुळे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यादृष्टीने हा वेळही अपुरा पडतो. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणातील ही अडचण दूर करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकाच्या अभ्यासामुळे एक दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरातून कार्यकर्ते तयार होणे सुलभ होईल. काही ठिकाणी तर अशा शिबिरांचीही आवश्यकता उरणार नाही. प्रशिक्षण शिबिरास येऊ न शकणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना संघटनेचा विचार आत्मसात करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल.
आपला विषय तसा कठीण विषय आहे. महाविद्यालयांत, विद्यापीठांत हा विषय अभ्यासाला जातो. त्या मंडळींनासुद्धा हा विषय समजायला कठीण जातो. हा कठीण विषय लक्ष देऊन अभ्यासला जावा हा या पुस्तकाचा हेतू आहे. महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक यांना ज्या एका गोष्टीची कल्पना नाही ती