पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२) उच्च विद्याविभूषित पैसेवाल्या सुशिक्षित भारतीय नागरिकाला, आपला एक बंधू चुकीचे काम करतो आहे, त्याला ते घाणीतील काम करायला लावण्यामागे मी स्वत: कारणीभूत आहे, मलिदा मी खातो आणि सफाई कामगाराला कचऱ्यात काम करावं लागतं, याची जाणीवच नाही. समाजातील श्रीमंत वर्गानं कचरा तयार करायचा आणि ज्याला कमी बुद्धी आहे अशा वर्गानं त्याचं व्यवस्थापन करायचं, हा एक सामाजिक अन्याय आपण करत आहोत याची या वर्गाला पुसटशीसुद्धा कल्पना नाही.
 या दोन अनुभवांवरून जर कचऱ्याचा प्रश्न मुळापासून सोडवायचा असेल, तर सफाई कामगारांनी स्पष्टपणे सांगायला हवे की, तुम्ही नागरिकांनी केलेली घाण आम्ही उचलणार नाही. आमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही वर्गीकरण करून स्वच्छ करून दिलेला कचरा, नव्हे तर वापरलेल्या वस्तूच आम्ही उचलू.
 नागरिकांनी ‘शून्य कचरा' ही संकल्पना आचरणात आणायला हवी. शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणण्यात पहिली अडचण आहे वर्गीकरणाच्या प्रशिक्षणाची. आज सतत सांगितलं जातं की, ओला कचरा आणि सुका कचरा असं वर्गीकरण करा. पण प्रत्यक्ष वर्गीकरणाचे शास्त्रोक्त वर्ग घेतले जात नाहीत. कचऱ्याचे वर्गीकरण कसं करायचं हे शिकवायला हवं. शिकवायचं असेल तर कचऱ्याचा अभ्यास करण्यासाठी प्रथम कचरा कुंडीत उतरायला हवं. घरातून तयार होणाऱ्या कचऱ्याकडे जरा लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त दहा प्रकारचा कचरा आपल्या घरातून निघतो.
१) निसर्गनिर्मित- बायोडिग्रेडेबल २) कागद ३) काच ४) नारळाच्या करवंट्या ५) चिनी मातीची भांडी ६) जाड प्लॅस्टिक ७) हाडं ८) पातळ प्लॅस्टिक ९) सॅनिटरी नॅपकिन्स १०) E-Waste आता या प्रत्येक कचऱ्याकडे आपण जरा अभ्यासू नजरेनं बघू या.

 १) निसर्गनिर्मित - बायोडिग्रेडेबल कचरा : खरंतर या कचऱ्याचा प्रश्न तेवढा गंभीर नाही कारण तुम्ही करा अथवा करू नका, निसर्ग या सर्व गोष्टींचे मातीत रूपांतर करतच असतो. तो तुमच्यासाठी थांबत नाही. मग आपण या कचऱ्याच्या व्यवस्थापनात का लक्ष घालायचं असा प्रश्न सहाजिकच मनात येईल. याचं कारण असं आहे की तुमचा परिसर तुम्हांला स्वच्छ ठेवायचा आहे. शिवाय या कचऱ्यापासून आपल्याला गॅस मिळू शकतो, खत मिळू शकतं. लगेच पुढचा प्रश्न आपल्या मनात येईल की, मग या कचऱ्यासाठी उभारलेला एकही गॅस प्रकल्प किंवा खत कारखाने चालू स्थितीत का नाही? याचं एकमेव कारण आहे आपण अनेक ठिकाणचा कचरा एकत्र करतो. त्याच्या वाहतुकीवर अतोनात पैसे खर्च


६ * शून्य कचरा