पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करावे लागतात. हे पैसे वरील गॅस प्रकल्प किंवा खत कारखाने ह्यांना परवडत नाहीत. आर्थिक गणित कोलमडतं आणि हे प्रकल्प बंद होतात. वाहतुकीचा खर्च जर नाहीसा करायचा असेल, तर जिथं हा कचरा तयार होतो तिथंच या कचऱ्याचं रूपांतर खतात करायला हवं. हे सहज करता येतं. यासाठी मी अविरतपात्र नावाचं संयंत्र बनवलं आहे. त्याच्या साहाय्याने तुम्ही घरच्या घरी सर्व निसर्गनिर्मित (बायोडिग्रेडेबल) वस्तूचं रूपांतर खतात करू शकता.
२) कागद : कागद वापरून झाला की आपण तो कसा टाकतो याचा अभ्यास केल्यास कागदाचा प्रश्न सुटतो. कागद वापरून झाला की आपण त्या कागदाचा बोळा करतो आणि तो कचऱ्याच्या बादलीत टाकतो. कागदाचा बोळा करणं आणि कागद फाडणं या दोन क्रिया आपण का करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘उगाचंच!' आणि कचऱ्याची बादली आहे म्हणून त्यात तो कागद टाकला जातो. म्हणजे कागदाचा कचरा शून्य करायचा असेल तर कागदाचा बोळा करायची किंवा तो फाडून बारीक करायची सवय प्रथम बंद करायला हवी. ती सवय बंद करायची असेल तर घरातील कचऱ्याच्या सर्व बादल्या काढून टाकायला हव्यात. कचऱ्याची बादलीच नाही मग बोळा केलेला कागद टाकणार कुठे? फाडलेले कागद टाकणार कुठे? अशी परिस्थिती निर्माण झाली की कागदाला कागदाच्याच स्वरूपात ठेवावं लागेल आणि असा कागद ठेवण्यासाठी प्रत्येक घरात एक जागा असतेच ती म्हणजे रद्दीचा खण. वर्तमानपत्राची रद्दी तुम्ही विकताच तिच्याबरोबर हे कागतही रद्दीच्या घरी आपोआप जातील आणि घरातील कागदाचा कचरा शून्य होईल. चार पैसे मिळतील.

३) काच : प्रत्येक घरात काच असतेच आणि ती फुटतेच. काच फुटली की करायचं काय असा प्रश्न पडतो. फुटलेली काच घरातील लोकांच्या हाता-पायाला लागू नये, म्हणून जाणीवपूर्वक उचलली जाते. ती कागदात गुंडाळून आपण कचऱ्याच्या बादलीत टाकतो. दुसऱ्या दिवशी ही कचऱ्याची बादली सोसायटीच्या मोठ्या कचऱ्याच्या बादलीत रिकामी होते. तो कचरा जो माणूस हातळतो त्याला काच हाताला लागून जखम होण्याची शक्यता असते. काचेचं सध्या होत असलेलं व्यवस्थापन योग्य नाही. मग काय करायला हवं? कागद जसा रद्दीतून कागदाच्या कारखान्यापर्यंत पोहोचवला जातो, तशीच आपल्या घरातील नको असलेली काच, तसेच सर्व प्रकारच्या फुटलेल्या काचासुद्धा काच कारखान्यांना भट्टीतील पहिला चार्ज म्हणून हव्या असतात. आपल्याकडील फुटलेली काच जर आपण आपल्या रद्दीवाल्यापर्यंत नेऊन दिली तर तो ती काच घेतो. मात्र आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. ठरावीक कालावधीनंतर जमा झालेल्या काचा घेऊन जाण्यासाठी


कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर * ७