Jump to content

पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सध्या वापरात असलेल्या पॅकिंग मटेरियलऐवजी जर चित्रात दिसणारा पॅकिंग पाउच पॅकिंगसाठी वापरला, तर तो वापरून झाल्यावर आपल्याला परत-परत वापरता येणार आहे. तो आकाराने खूप लहान नाही, त्यामुळे त्याला टाकून दिले जाणार नाही. आणि खूप मोठाही नाही त्यामुळे तो कोठे ठेवायचा, हा प्रश्न पडणार नाही. आणि समजा, एखाद्याने तो फेकून दिलाच, तर तो आपला परिसर विद्रूप करणार नाही.
 या पॅकिंग पाउचमध्ये नक्की कोणते प्लॅस्टिक घालायचे, हा प्रश्न एवढे सांगूनही काही जणांच्या मनात येईल. या प्रश्नाचे उत्तर समोर दिसणाऱ्या प्लॅस्टिकला पुढील चार प्रश्न विचारले असता, लगेच मिळेल -
१. हे प्लॅस्टिक वापरून झाले आहे का ?
२. हे प्लॅस्टिक स्वच्छ आहे का ?
३. हे प्लॅस्टिक मऊ आहे का ?
४. ह्या प्लॅस्टिकला बाजारात किंमत मिळत नाही का ?
 ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी आली, तर ते प्लॅस्टिक पॅकिंग पाउचमध्ये बंद करायला योग्य आहे, असे समजावे.
 लोकांनी टाकून दिलेले प्लॅस्टिक उचलायचे, ते साफ करायचे आणि त्याचा पॅकिंग पाउच बनवायचा तर तो महाग होईल.
 मग कारखानदार तो विकत कसा घेईल ?
 वापरून झालेले प्लॅस्टिक जर स्वच्छ करून कोरडे केले, तर ते पुन्हापुन्हा वापरता येईल. रद्दीवाल्याकडे जर आपण हे पातळ प्लॅस्टिक घेऊन गेलो, तर तो ते विकत घेत नाही; पण त्याच स्वच्छ अन् कोरड्या, वापरून झालेल्या प्लॅस्टिकचे चित्रात दिसतात त्याप्रमाणे पॅकिंग पाउच केलेत, तर कोणताही कारखानदार ते वाजवी भावात सहज विकत घेईल.
 अर्थात असे करण्यासाठी थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन हवा. तो प्रत्येक माणसाला कसा असेल ? पण प्रत्येक माणूस पातळ प्लॅस्टिकची पिशवी वापरतोच. जर मनापासून ठरवलं, तर पॅकिंग पाउचऐवजी तुमच्या घरातून वापरून झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून तुम्ही उशी किंवा उशा बनवू शकता. तुम्ही जर जास्तच पातळ प्लॅस्टिकचा वापर करत असाल, तर त्यापासून गाद्या तक्के, रजया ह्या वस्तूसुद्धा बनू शकतील.

 वापरून झालेले आणि वाऱ्यावर सोडलेले प्लॅस्टिक म्हणजे एक महाभयंकर राक्षस आहे. या राक्षसाच्या मुसक्या बांधून आपण त्याला पॅकिंग पाउचमध्ये जेरबंद केल्यावर तो आपल्या सेवेला अनंतकाल हजर राहणार आहे. असे करण्याने आपला परिसर स्वच्छ होईल, हा केवढा मोठा फायदा आहे.*


पापी प्लॅस्टिक * ४५