पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११. सोसायटीसाठी अविरतपात्र

 सर्व पुस्तक वाचून झाल्यावर किंवा माझी संपूर्ण शून्य कचरा ही संकल्पना समजून घेतल्यावर काही लोकांच्या मनात ही संकल्पना मोठ्या स्वरूपात सोसायटी स्तरावर कशी राबवता येईल याचे विचारचक्र सुरू होते. खरेतर माझा स्वत:चा सामुदायिकरीत्या कचऱ्याचा प्रश्न हाताळण्यास विरोध आहे. कचरा जेथे तयार होतो तेथेच त्यावर प्रक्रिया करणे हे सर्वांत कमी खर्चाचे आणि सोपे असते. परंतु आपल्या समाजात सर्व गोष्टी मोठ्या स्तरावर, सामुदायिकरीत्या आणि समारंभपूर्वक करायची लोकांना भारी हौस असते. असे करण्यातील धोके आणि अडचणी प्रथम विचारात घ्यायला हव्यात. त्यांची यादी करायची झाल्यास ती अशी होईल.
 १) कचऱ्यापासून खत बनविण्याच्या कामात सर्वांत महत्त्वाची आणि मूलभूत गरजेची गोष्ट असते ती म्हणजे सोसायटीतील सर्व सभासदांचे सहकार्य आणि सहयोग. बहुतेक संकुलांत या दोन गोष्टींचा प्रामुख्याने अभाव असतो. आपल्या बहुतेक सोसायट्या ह्या नावालाच को-ऑपरेटीव्ह सोसायट्या असतात.
 २) सामुदायिकरीत्या प्रकल्प राबवायचा झाल्यास एका कुटुंबासाठी जे अविरत पात्र काम करते त्याच्यापेक्षा आकाराने मोठे अविरत पात्र बनवावे लागेल. अविरत पात्राचा आकार संकुलातील सभासदांच्या संख्येवर अवलंबून राहील. त्यासाठी साधारणपणे कमीतकमी १00 चौरस फूट जागा लागेल. साहजिकच त्यासाठी लागणारा खर्चही जास्तच असणार आहे.
 ३) कल्पना करू या की एखाद्या सोसायटीत अशी जागा आहे आणि सोसायटी पैसेदेखील खर्च करायला तयार आहे. या प्रकल्पाला पहिला विरोध होईल तो ज्या सभासदाच्या घराजवळ हा प्रकल्प उभा राहणार आहे त्या सभासदाकडून आणि तेथेच प्रकल्प गोठेल.
 ४) समजा होणारा विरोध डावलून एखाद्या सोसायटीत उत्साहाच्या भरात प्रकल्प सुरू केला, तर त्या प्रकल्पावर काम कोणी करायचे असा प्रश्न निर्माण होईल. बहुतेक जण लगेच म्हणतात की, “आमचा कचरेवाला किंवा सोसायटीचा वॉचमन ते काम करेल.' सोसायटीतील सभासदांनी कचरा करायचा आणि त्याचे व्यवस्थापन कचरेवाला किंवा वॉचमन लोकांनी का करायचे? एखाद्या माणसाला घाण काम करायला लावणे हा सामाजिक अन्याय आहे. ह्या मानसिकतेतूनच आपल्याकडे जातिव्यवस्था निर्माण झाली आहे.

 ५) आजकाल आणि भविष्यात कचरा व्यवस्थापनातील घाण काम करायला माणसे मिळणार नाहीत आणि मिळालीच तर त्यांना भरपूर मोबदला द्यावा लागणार


४६ * शून्य कचरा