पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नको असलेले पदार्थ घरात कुठेकुठे अन् कसेकसे तयार होतात ते आता आपण पाहू या -
अ) कागदांचा कचरा :
 सकाळपासून घरात कागद यायला सुरुवात होते. प्रथम वर्तमानपत्रे येतात. त्यातून अनेक हॅण्डबिले येतात. दुपारी टपाल येते. त्यातून पाकिटे येतात. सायंकाळी आपण हिशोब करायला बसतो, तेव्हा आपल्याच खिशातून अनेक चिठ्या-चपाट्या बाहेर पडतात. या सर्व वस्तू बघून झाल्या की त्या आपल्याला नको असतात. या वस्तूमधील फक्त वर्तमानपत्रांचे पैसे आपल्याला रद्दीतून मिळतात, म्हणून फक्त तेवढे ठेवून बाकी सर्व वस्तूंना आपण कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाकतो. छोटे कागद, पॅकिंग बॉक्सेस ह्या वस्तू रद्दीवाला घेत नाही, हा आपला चुकीचा समज आहे. ज्या वस्तू रिसायकल होतात त्या सर्व तो घेतो.
या वस्तू आपण कचऱ्याच्या बास्केटमध्ये कशा टाकतो हे बघू या -
 हॅण्डबिले फाडून अथवा बोळा करून; पाकिटे वेडीवाकडी फाडून; चेक्स, रिपोर्टस आणि बिले यांना असलेली परफोरेशन्स फाडून. असे आपण का करतो ? हॅण्डबिले का फाडतो ? त्या कागदांचा बोळा का करतो ? पाकिटे वेडीवाकडी का फाडतो ? चेक्स, रिपोर्टस आणि बिले यांना असलेली परफोरेशन्स का फाडतो ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे उगाचच !
 म्हणजे आपल्या सवयी थोड्याशा बदलल्या, तर निदान कागदांचा कचरा तयार होणे तरी थांबेल. व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले कागद रद्दीत विकता येतील. व्यवस्थित ठेवलेला बारक्यातला बारीक कागदही रद्दीवाला नक्की घेतो.
ब) स्वयंपाकघरातून तयार होणारा कचरा :
येथे नको असलेल्या वस्तू तीन वेळेला तयार होतात.
१) स्वयंपाक करण्यापूर्वी
२) स्वयंपाक व जेवणे झाल्यानंतर
३) बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांमुळे

१) स्वयंपाक करण्यापूर्वी :

 भाजी निवडल्यानंतर प्रामुख्याने ह्या गोष्टी तयार होतात. निवडून झाल्यावर नको असलेल्या पदार्थांचे रूपांतर जर बारीक तुकड्यांत केले, तर एकतर त्यांचे आकारमान कमी होते आणि त्यांचे गांडूळखतात रूपांतर होण्यास कमी वेळ लागतो. पदार्थ बारीक करण्यासाठी सुरी, कात्री किंवा विळी यांचा उपयोग करावा. मिक्सर अथवा फूड प्रोसेसरचा उपयोग केल्यास अति उत्तम.


शून्य कचरा : प्रत्यक्ष कृती * ३५