पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२) स्वयंपाक व जेवणे झाल्यानंतर :
 खरे तर माणसाच्या हव्यासापाई हा कचरा तयार होतो. जेवढे पाहिजे, तेवढेच बनविले अन् जेवढे पाहिजे, तेवढेच ताटात वाढून घेतले, तर उरलेल्या अन्नाचा व उष्ट्याखरकट्यामुळे निर्माण होणारा कचरा तयारच होणार नाही. पण प्रत्यक्षात असे होत नाही. उरलेले अन्न टाकून दिले जाते आणि मग त्याचा कचरा होतो. त्याऐवजी हे उरलेले अन्न जर ‘अविरतपात्रात’ - टाकले तर, त्यापासून गांडूळ खत तरी तयार होईल. भांडी घासण्यापूर्वी जर ती विसळून घेतली, तर पानात टाकलेले अन्न ड्रेनेजमध्ये जाणार नाही. विसळलेले पाणी गाळण्याने गाळून घ्यावे. पाणी झाडांना घालावे व गाळण्यातील अन्न ‘अविरतपात्र' टाकावे.
३) बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थामुळे :
 हे पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून, अॅल्युमिनिअमच्या वेष्टणातून अथवा अॅल्युमिनिअमच्या बॉक्समधून घरात येतात. बाहेरील आवरण व्यवस्थित उघडून आतील पदार्थ काढून घेतला व ते आवरण लगेच धुतले, तर ते अतिशय कमी श्रमांत चांगले स्वच्छ होते. साहजिकच त्या आवरणांचे रूपांतर कचऱ्यात होत नाही.
 दुधाच्या पिशवीला चाकूने जर एक छोटीशी चीर देऊन दूध काढून घेतले आणि पिशवी पाण्याने लगेच धुतली, तर दुधाची पिशवी कचरा होणार नाही. न धुता तशीच ठेवली, तर तिला आंबूस वास यायला लागेल. एकदा का घाण वास यायला लागला की पिशवीला धुणे किळसवाणे होते. कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी सुरीने तीन बाजूंनी कापली तर तिचे सपाट प्लॅस्टिक तयार होते. पिशवी पाण्याने धुण्यापेक्षा हे सपाट प्लॅस्टिक धुणे सोपे जाते आणि ते जास्त चांगले स्वच्छ होते.
क) छोट्या-छोट्या वस्तूंमुळे होणारा कचरा :
 खालील गोष्टी वेळीच वेगळ्या करून, कोप-यात बांधलेल्या प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत (झोल्यात) (फोटो पाहा) जमा करत गेल्यास त्यांचा कचरा होत नाही. या वस्तू कचरा गोळा करणा-या माणसांना दिल्यास त्यांना त्यापासून चार पैसे मिळतील आणि या सत्कर्माबद्दल थोडेसे पुण्य आपल्या पदरी पडेल.
पिशवीत टाकायच्या वस्तू :
 टूथपेस्टचे टोपण,बाटल्या - काचेच्या, प्लॅस्टिकच्या, बाटल्यांची झाकणे, दाढीचे रेझर, अॅल्युमिनिअमचे खोके, डिस्पोझेबल प्लॅस्टिकचे पेले, थर्मोकोलचे पेले, रेडीमेड कपड्यांबरोबर येणारे प्लॅस्टिक.

 त्यातून येणारे पॅकिंग मटेरिअल, प्लॅस्टिकच्या पिना, प्लॅस्टिकचे दोरे, दाढीची पेस्ट, नको असलेले अथवा वापरून झालेले किंवा मशिन्सचे मोडलेले छोटे-छोटे भाग, रिफिल्स, पेन्स, सेल, फ्लॉप्या, सीडीज, कॅसेटस्, फोटो रोलच्या डब्या,


३६ * शून्य कचरा