पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सभासदाच्या घरातील ओला कचरा मोलकरणीने का म्हणून खाली नेऊन द्यायचा ? एकवेळ स्वत:च्या ओल्या कचऱ्यात स्वतःला हात घालायला किळस वाटणार नाही; पण दुस-याच्या कच-यासमोर उभे राहायलासुद्धा कोणालाही किळसच वाटेल. मोलकरणीच्या आणि वॉचमनच्या दृष्टीने सभासदांचा कचरा हा दुसऱ्याचाच कचरा आहे. या घाण कामाबद्दल सभासद त्यांना घसघशीत वेगळे पैसे देणार आहेत का ? मी घाण करायची आणि दुसऱ्याने ती साफ करायची ही मानसिकता प्रथम बदलली पाहिजे."
 आपल्याकडे एखादा माणूस परदेशी गेला की अभिमानाने सांगतो की, तेथे सगळी कामे मी स्वतः करायचो; पण त्याच माणसाला भारतात घरी आल्यावर मात्र मोलकरीण लागते. मोलकरीण, कामवाली बाई, साफसफाई कामगार, असे लोक तयार करणे, हा खरे तर सामाजिक अन्याय आहे. असे म्हटले तर लगेच लोक म्हणतील, "मग या लोकांनी करायचे काय ?" या लोकांना अशी कामे देऊन सामाजिक अन्याय का होतो ? कारण या लोकांना अत्यंत अल्प पैसे दिले जातात. स्वच्छता करण्याच्या कामाचा अत्यंत कमी मोबदला दिला जातो. येथेच स्वच्छतेला आपण किती खालचा दर्जा देतो हे दिसून येते.
 "आपल्याला कायम एखादे काम मोठ्या स्वरूपात करायचा खूप सोस असतो. जसजसा प्रकल्प मोठा होत जातो, तसतसे त्याचे नियोजन अवघड बनत जाते. त्यातून जर का तो सतत चालणारा प्रकल्प असेल, तर सातत्याने अनेक जणांकडून शिस्तबद्ध काम करून घेणे खूपच अवघड असते. मोठी कामे सोपी आणि यशस्वी तेव्हाच होतील, जेव्हा त्यांच्यासाठी आपण मुबलक फंडाची सोय करू. येथे फंडाच्या पेटीत खुळखुळाट आहे. जे काम १५ X ११ X ९ इंचांच्या जाळीवर प्लॅस्टिकच्या टोपलीत दिवसातील फक्त एका माणसाची (स्वतःची), फक्त १५ ते २० मिनिटे खर्च करून होईल, त्यासाठी एवढा खटाटोप का करायचा ?"
 मिक्सरचा कारखानदार म्हणाला, “साहेब, मला माझे मशीन विकायचे आहे.' मी म्हणालो, “आता कसे मुद्द्याचे बोललास."

 लहानपणी तिसरी-चौथीत आपल्याला शिकविलेले असते. ग्रामपंचायत, नगरपालिका यांची कामे काय ? त्यांच्या अनेक कामांत गावात स्वच्छता ठेवणे' हे एक काम असते. येथे मनात एक प्रश्न निर्माण होतो. स्वच्छता जर ग्रामपंचायतीने करायची, तर अस्वच्छता कोणीतरी केली पाहिजे. लहानपणापासून आपण असेच गृहीत धरून चालतो. घाण ही होतेच, कचरा निर्माण होणारच. तो कोण तयार करतो ? का तयार करतो? आणि कसा तयार करतो ? याचा आपण कधीच मागोवा घेत नाही. याचे कारण असे की, या सगळ्यांचे उत्तर एकच असते; ते असते, आपण स्वतः'.


येथे कचरा तयार होत नाही * २१