पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कचरा निर्मूलनाच्या अनेक पद्धतींत एक योजना बऱ्यापैकी यशस्वी झालेली दिसते; ती आहे ड्रेनेज सिस्टिमची. पूर्वी आपल्याकडे पाटीचे संडास असायचे. डोक्यावरून मैला वाहून नेणारी माणसे मी बघितली आहेत. हा सामाजिक अन्याय नाहीसा होण्यामध्ये ड्रेनेज सिस्टिमचा मोठा वाटा आहे. ही सिस्टिम का यशस्वी होते ? याचे खरे कारण आहे नैसर्गिक गुरुत्वाकषर्णाचा नियम. खरे तर, खऱ्या अर्थाने ही योजना यशस्वी झालेली नाही. कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने आपण मैला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवला. तो समुद्रात, नदीत न सोडता त्यापासून खत बनविले, तर निर्मूलनाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. आजकाल सगळ्या योजना कचरा उचलायचा आणि दुसरीकडे नेऊन टाकायचा, हेच काम करीत असतात.
 ज्या गोष्टीतून बऱ्यापैकी पैसा निर्माण होतो, ती गोष्ट यशस्वी होते. साधे आपल्या घरात बघितले, तर आपल्याला दिसून येईल की, रोजचे दैनिक आपण व्यवस्थित घडी घालून एकत्र ठेवतो. वास्तविक दैनिक वाचून झाले की तो कचराच आहे; पण असे अंक आपण कधीच सोसायटीच्या साफसफाई कामगाराला देत नाही. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की, याच अंकांची रद्दी विकून आपल्याला पैसे मिळणार असतात. तसे कालच्या उरलेल्या भाजीचे, मटारच्या सालांचे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण त्यांना वाऱ्यावर टाकून देतो आणि मग कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो.
 जर का नगरपालिकेने असे जाहीर केले की, तुमच्या वावचे (कचऱ्याचे) घनकचरा आणि खते यांमध्ये रूपांतर करून तुम्ही ते आमच्याकडे घेऊन आलात, तर आम्ही ते विकत घेऊ! तर घरच्याघरी कचऱ्याचे रूपांतर खतात करण्यासाठी लोक निश्चितच तयार होतील. परंतु नगरपालिका हे खत विकत घेणार नाही. कारण या खताची किंमत ती काय असणार आहे ! त्यातून नगरपालिकेला किती पैसे मिळणार ? शिवाय हे खत नगरपालिका कोणाला विकणार ? खताच्या विक्रीला जास्त पैसे मिळणार नाहीत म्हणून खरेदी कवडीमोल भावाने होणार. आज कचरा वाहून नेण्यासाठी केवढी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. तिच्यावर किती अब्जावधी पैसे खर्च होत आहेत. ही या कचऱ्याची किंमतच नव्हे का ? हे पैसे कचऱ्यापासून बनविलेल्या खताच्या खरेदीसाठी वापरता येणार नाहीत का?

 कोठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. सरकारी यंत्रणेला हे पटवणे खूपच अवघड आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, तर ही अशक्य कोटीतील गोष्टसुद्धा शक्य होईल. सहकारी तत्त्वावर जर दूध गोळा केले जाते; आणि अतिशय दर्जेदार दूध जर मिळू शकते, तर दर्जेदार खत का नाही मिळणार ? प्रत्येक घरातून जर का खत प्रकल्प


२२ * शून्य कचरा