आपण नेहमी ही गाठ कापूनच पिशवी उघडतो आणि पिशवीचा एक भाग कचरा म्हणून जन्म घेतो. आज मला या कचऱ्याचा जन्म होऊच द्यायचा नव्हता. मी अगदी थोडासा वेळ दिला आणि प्लॅस्टिकच्या पिशवीच्या गाठीवर लक्ष केंद्रित केले. माझ्याकडून ती गाठ खरोखरच अल्प वेळात सुटली. सर्व पिशव्यांच्या गाठी सोडल्यानंतर लक्षात आले की, प्लॅस्टिकच्या पिशवीला घट्ट गाठ बसूच शकत नाही.
पूर्वी मी, या पिशव्यांतील अन्न काढून पिशव्या कचऱ्याच्या बादलीत टाकल्या असत्या, पण आज मला तसे करायचे नव्हते. लागल्या हाती मी त्या पिशव्या उलट्या करून साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या. टेबलावर जेवणाची मांडामांड होईस्तोवर माझ्या पिशव्या धुऊन झाल्या होत्या. जेवण होईस्तोवर त्या वाळून कोरड्यादेखील झाल्या होत्या. सुट्टीचा दिवस कसा संपला, ते समजलेच नाही. आमच्या कचऱ्याच्या बादलीत जेमतेम तीन-चार इंच कचरा जमा झाला होता. हा ओला कचरा असाच ठेवला, तर यावर चिलटे बसणार, दुर्गंधी सुटणार. यापासून बचाव कसा करायचा ? वाटले याला झाकून ठेवावे, पण कितीही झाकून ठेवले, तरी बादली उघडताच वास येणारच. दुर्गंधी आणि चिलटे यांपासून बचाव करणारे झाकण मला पाहिजे होते. ते झाकण होते माती ! मी धावतच अंगणात गेलो. मला चांगली जिवंत माती हवी होती. पण पसाभर चांगली माती मला मिळेना. सर्व सोसायटीतील जमिनी सिमेंट क्राँक्रिटच्या झाल्या होत्या. मातीला आपण आई मानतो. आज आपली आईच आपल्यापाशी नाही! मग मी एका रोपवाटिकेत जाऊन तेथून चांगली जिवंत माती विकत घेऊन आलो. चांगली पसा-दोन-पसा माती आणली. ती माती बादलीतील कच-यावर पांघरूण घातल्यासारखी पसरली. आता बादलीत कचरा दिसतच नव्हता. मातीच्या पांघरुणाखाली झोपलेल्या कचऱ्याचे यथावकाश मातीत रूपांतर होणार होते.
शून्य कचरा : मला लागलेला शोध * १९